Hardik Pandya Trade Deal: मुंबई इंडियन्सने २०२४ मध्ये हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघात स्थान दिलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. पण हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. आयपीएलच्या आगामी हंगामा हार्दिक पंड्या दुसऱ्या संघाकडून खेळणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यानंतर हार्दिक पंड्याच्या ट्रेडची चर्चा रंगायला सुरूवात झाली होती. पण तो नक्की कोणत्या संघाकडून खेळणार हे निश्चित झालेलं नाही. माध्यमातील वृत्तानुसार मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू आहे.

स्पोर्ट्सस्टारच्या वृत्तानुसार, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हार्दिक पंड्याची ट्रेड डिल सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. हार्दिक पंड्या पंजाब किंग्स संघात गेल्यानंतर त्याच्या बदल्यात मुंबईला पंजाबचे २ खेळाडू हवे आहेत. मुंबईला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि यष्टीरक्षक फलंदाज विष्णू विनोद संघात हवे असल्याचं म्हटंलं जात आहे. पंजाब किंग्ससह ट्रेड डिल होण्याआधी हार्दिकचं नाव राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघासोबतही जोडलं गेलं होतं. पण हार्दिकसारखा अनुभवी खेळाडू आता पंजाब किंग्सच्या हाती लागू शकतो. रिकी पाँटिंग पंजाब किंग्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यामुळे पाँटिंग हार्दिकसारख्या अनुभवी अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात आणण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे.

हार्दिक पंजाबमध्ये जाणार, मग मुंबईत कोण येणार?

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये कॅश डिल होणार नाही. हार्दिकच्या बदल्यात मुंबई इंडियन्सला एक नव्हे, तर दोन खेळाडू हवे आहेत. मुंबई इंडियन्सला अनुभवी गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे मुंबईने अर्शदीप सिंगची मागणी केली आहे. यासह मुंबई इंडियन्सला यष्टीरक्षक फलंदाज विष्णू विनोद आपल्या संघात हवा आहे. विष्णू विनोदकडे मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. कारण याआधीही त्याने या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. जर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्स संघात आला, तर मुंबई इंडियन्सचं गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत होणार आहे. कारण मुंबईत जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज आहे. बुमराह आणि अर्शदीप हे दोघेही सुरूवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यास तरबेज आहेत.

आधी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर होती. पण आता २ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व संघांना १७ नोव्हेंबरपर्यंत आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणारी ट्रेड डिल शेवटच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार या आठवड्याच्या शेवटी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.