IND vs AUS T20 World Cup Hardik Pandya: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मागुन घेतल्याने हार्दिक पांड्याला सर्वात वाईट ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. पण त्यातून सावरून आता टी २० विश्वचषकात पांड्याने स्वतःला काही प्रमाणात सिद्ध केलं आहे. भारताच्या यशस्वी सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे. हार्दिकला फॉर्म शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला खरा पण तरीही त्याने वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.पाच डावांत हार्दिकने आठ विकेट घेतल्या आणि शनिवारी बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी केली. केवळ २७ चेंडूत त्याने केलेल्या नाबाद ५० धावांमुळे भारताला १९६/५ अशी भक्कम धावसंख्या गाठता आली. भारताने शेवटी ५० धावांनी विजय मिळवला आणि हार्दिकच्या अष्टपैलू खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

२०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर दुखापतीमुळे पांड्याने ब्रेक घेतला होता. खेळात पुनरागमन केल्यापासून, गुजरात टायटन्ससह कर्णधारपदाच्या कार्यकाळात अनेकदा हार्दिकने गोलंदाजी न करण्याचा पर्याय निवडला होता परिणामी हार्दिकच्या गोलंदाजीवर महत्त्वपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा प्रश्न सोडवून आता हार्दिकने स्वतः ला सिद्ध केलं आहे. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अलीकडेच हार्दिकसह त्याच्या सातत्यपूर्ण प्रभावी गोलंदाजीबद्दल चर्चा केली . शास्त्रींनीं हार्दिकला आठवण करून दिली की अशा काही प्रसंग होते जेव्हा त्याच्या गोलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती, ज्याला हार्दिकने अगदी सरळ उत्तर दिले होते.

हार्दिक पांड्याचं रोखठोक उत्तर

आयसीसीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हार्दिकने म्हटले आहे की, “एक वर्ष मी गोलंदाजी केली नाही, अन्यथा, मी प्रत्येक संघासाठी गोलंदाजी केली आहे. तरी ‘हार्दिक पांड्या’च्या गोलंदाजीचा विषय उगाच मोठा झाला आहे. माझ्याकडची सगळी आयुधं घेऊन मैदानात उतरताना मला खूप मेहनत घ्यावी लागते आणि अजूनही घ्यावी लागणार आहे. मुळात मला संघात योगदान देण्यासाठी नेहमीच एक अतिरिक्त संधी मिळते, कारण जर मी फलंदाजी उत्तम केली तर माझ्या गोलंदाजीवरही चांगला प्रभाव असतो आणि गोलंदाजी चांगली केली तर बॅटिंग चांगली होते यामुळेच माझा आत्मविश्वास वाढतो”

हार्दिकने यंदाच्या आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने गोलंदाजी केली आहे, त्यात त्याला फार यश मिळाले नाही ही बाबही खरी आहे. पण आज (सोमवारी) होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात हार्दिक टीम इंडियातील हुकुमी एक्का सिद्ध होऊ शकतो.

Ind vs Aus T20 WC: सेमीफायनलचं गणित आकड्यांमध्ये अडकलं; भारतही पडू शकतो बाहेर, वाचा काय आहे नेमकं सूत्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा!

टीम इंडियाने आतापर्यंत आयर्लंड, युनायटेड स्टेट्स आणि पाकिस्तानवर विजय मिळवून गटात वर्चस्व राखले आहे. लॉडरहिल येथे कॅनडाविरुद्धचा भारताचा सामना वाहून गेला, पण सुपर आठ टप्प्यात रोहित शर्माच्या संघाने अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध जोरदार विजय मिळवला. उपांत्य फेरीतील स्थान अद्याप निश्चित नसले तरी, भारताच्या सातत्यपूर्ण अजिंक्य कामगिरीमुळे चाहत्यांकडून आणि तज्ञांकडूनही कौतुक होत आहे. दरम्यान सध्या २ पेक्षा जास्त नेट रन रेटसह भारत आरामात शीर्षस्थानी बसला आहे, पण हे स्थान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय अत्यंत महत्त्वाचा असेल.