Hardik Pandya Unfollow MI on Instagram: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मधील प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पंड्याच्या संघातील भवितव्याबाबत नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी लक्षात आणून दिलं की हार्दिकने इन्स्टाग्रामवरून मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याचं दिसत आहे. त्यानंतर या चर्चांनी जोर धरला आणि संघातील वातावरण बिघडल्याच्या अफवांनाही हवा मिळाली.
१० मे रोजी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. त्यानंतर काही काळासाठी हार्दिकच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर तो फक्त १५० अकाउंट्सना फॉलो करत असल्याचं दिसत होतं आणि त्यामध्ये मुंबई इंडियन्सचं नाव नसल्याचं चाहत्यांच्या निदर्शनास आलं.
मात्र काही मिनिटांतच चाहत्यांनी आणखी एक गोष्ट हेरली की, हार्दिकच्या फॉलोइंगची संख्या पुन्हा १५१ झाली होती आणि त्यामध्ये मुंबई इंडियन्सचं नाव पुन्हा दिसू लागलं. पण सोशल मीडियावरील हा काही मिनिटांचा बदलही अफवांना खतपाणी घालण्यासाठी पुरेसा ठरला. काही क्षणांतच विविध चर्चा आणि तर्कवितर्क लावण्यात आले.
हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमनानंतर आणि आयपीएल २०२४ आधी त्याची कर्णधारपदी नियुक्ती झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मुंबईला आयपीएलचं पाच वेळा जेतेपद पटकावून देणाऱ्या रोहित शर्माला अचानक कर्णधारपदावरून काढून टाकत हार्दिकला नेर्तृत्त्वाची जबाबदारी दिल्याने चाहते नाराज होते. हार्दिकची स्टेडियममध्ये हुर्याे उडवण्यात आली होती. त्यामुळे संघाशी किंवा हार्दिकशी संबंधित प्रत्येक वादग्रस्त घडामोड सोशल मीडियावर बारकाईने पाहिली जात आहे.

हार्दिक पंड्याने खरंच मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं होतं का?
तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर काही काळासाठी तरी हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केल्याचं दिसत होतं. सोशल मीडियावर चाहत्यांच्या हे निदर्शनास येताच काही वेळात पुन्हा बदल झाला. मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युझर्सनी हार्दिकच्या फॉलोइंग लिस्टमधून मुंबई इंडियन्स गायब असल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. मात्र काही मिनिटांतच मुंबई इंडियन्सचं अकाउंट पुन्हा हार्दिकच्या फॉलो लिस्टमध्ये दिसू लागलं. त्यामुळे हे चुकून झालेलं अनफॉलो होतं, तांत्रिक बिघाड होता की पराभवानंतरच्या निराशेतून घडलेली कृती होती, याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले.

हार्दिक पंड्या किंवा मुंबई इंडियन्सकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी हा संपूर्ण प्रकार केवळ सोशल मीडियावरील चर्चांपुरताच मर्यादित असून, खेळाडू आणि फ्रँचायझी यांच्यात खरोखर मतभेद आहेत, याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही, हार्दिकच्या कर्णधारपदाभोवतीचा जुना वाद आणि मागील दोन हंगामांतील मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी पाहता, या घटनेने सोशल मीडियावर मोठं लक्ष वेधून घेतलं आहे.
