Hardik Pandya Statement on Shardul Thakur: मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील सलामीचा सामना जिंकत १४ वर्षांची प्रतिक्षा संपवली. मुंबई इंडियन्सने केकेआरचा ६ विकेट्सने पराभव करत २०१२ नंतर पहिल्यांदाच सलामीचा सामना जिंकला. मुंबईच्या या विजयात शार्दुल ठाकूर, रोहित शर्मा, रायन रिकल्टन यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. पण सामनावीर पुरस्कार मात्र पदार्पण करणाऱ्या शार्दुल ठाकूरला देण्यात आला. ज्याने सामन्यात ३ महत्त्वाच्या विकेट्स घेत मुंबईला सामन्यात कायम ठेवलं.
शार्दुल ठाकूरने कमालीची गोलंदाजी करत केकेआरला कमी धावसंख्येत रोखण्यात मोठी भूमिका बजावली. शार्दुलने अजिंक्य रहाणे व फिन एलनची सलामी जोडी तोडत मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर कॅमेरून ग्रीनला माघारी धाडलं. त्यानंतर उत्कृष्ट फॉर्मात खेळत असलेल्या अजिंक्य रहाणेला आपल्या जाळ्यात अडकवत बाद केलं. यासह शार्दुलने सलग ३ षटकांत ३ विकेट्स घेतल्या.
शार्दुल ठाकूरच्या कामगिरीबाबत बोलताना हार्दिक पंड्या सामन्यानंतर म्हणाला, “मी त्याला (शार्दुलला) याच हंगामात सांगितलं, ‘आता वेगवेगळे संघ बदलणं थांबव. मला तू तुझ्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत इथेच राहावं असं वाटतं.’ तो एक वेगळ्या स्वभावाचा खेळाडू आहे. त्याचं मन खूप मोठं आहे. मैदानावर तो ज्या पद्धतीने फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतो, ते खरोखर अप्रतिम आहे. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे,” असं हार्दिक पंड्याने सामन्यानंतर ठाकूरचं कौतुक करताना सांगितलं.
हार्दिक पंड्याच्या वक्तव्यावर शार्दुल ठाकूरने काय उत्तर दिलं?
शार्दुल ठाकूरला सामनावीर पुरस्कारानंतर हार्दिकच्या वक्तव्याबद्दल विचारताच म्हणाला, “मी २०१०, २०११ आणि २०१२ या हंगामांमध्ये नेट बॉलर म्हणून संघासोबत होतो. शांतपणे इथे गोलंदाजी करत स्वतःची छाप पाडत होतो. तेव्हापासूनच मला वाटत होतं की एक दिवस ही संधी मिळेल आणि अखेर आता मी माझ्या घरच्या संघासाठी,मुंबई इंडियन्ससाठी खेळतोय, त्यामुळे हा क्षण खूप खास आहे.”
“मी इथेच कायम राहिलो तर मला खूप आनंद होईल. ही माझं घरच मैदान आहे आणि इथे आल्यावर मला मिळालेला पाठिंबा अप्रतिम होता. त्यामुळे संपूर्ण मुंबई इंडियन्स कुटुंबाचे आभार त्यांनी मला लखनौ सुपर जायंट्सकडून ट्रेड करून घेतलं आणि पहिल्याच सामन्यात संधी दिली,” असं शार्दूलने म्हणाला.
केकेआरविरूद्ध सामन्यात रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा यांनी झटपट अर्धशतकं झळकावत मुंबई इंडियन्सच्या विजयाचा पाया रचला. २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रिकल्टन (४३ चेंडूत ८१) आणि रोहित (३८ चेंडूत ७८) यांनी फक्त ७१ चेंडूत १४८ धावांची दमदार सलामी भागीदारी केली आणि विजयाचा पाया रचला. मुंबईने १९.१ षटकांत ४ बाद २२४ धावा करत लक्ष्य पार केलं. हा मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावरील विक्रमी पाठलागही ठरला.
