Hardik Pandya Warns Rohit Sharma: आयपीएल २०२६ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या सीझनला सुरूवात होत आहे. या सीझनसाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत आणि बीसीसीआयने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यांचं वेळापत्रकदेखील जाहीर केलं आहे. यादरम्यान यंदाचा मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात ताकदवान संघ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण यादरम्यान हार्दिक पंड्याने सीझन सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला वॉर्निंग दिल्याचा रिपोर्ट समोर आला होता, यावर मुंबई इंडियन्सने उत्तर दिलं आहे.

पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिला होता. आता मुंबई इंडियन्सने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिक पंड्या IPL 2026 सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला काय म्हणाला?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्यात असा दावा करण्यात आला की हार्दिक पंड्याने रोहित शर्मा यांना इंडियन प्रीमियर लीग २०२६ सुरू होण्यापूर्वी इशारा दिला आहे. एक्सवर एका युजरने लिहिलं की, “हार्दिक पंड्याने व्यवस्थापनाला सांगितलं आहे की यावेळी रोहित शर्मा अपेक्षित कामगिरी करू शकला नाही, तर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. गेल्या १०–१२ वर्षांत रोहितच्या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन खूप नाराज आहे. तो अनेकदा एका हंगामात फक्त २०० ते ३०० धावा करतो आणि त्याचाही स्ट्राईक रेट साधारण १२० च्या आसपास असतो, तरीही तो संघातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे,” असा दावा त्या पोस्टमध्ये करण्यात आला.

मात्र हा दावा लगेचच मुंबई इंडियन्सच्या अधिकृत अकाउंटने फेटाळून लावला. फ्रँचायझीने हार्दिक पंड्याचा GIF शेअर करत “कुछ भी (काहीही)” असं लिहित या दाव्याला स्पष्टपणे नाकारलं आणि ही खोटी बातमी असल्याचंदेखील सांगितलं आहे.

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हे दोघेही संघाचे महत्त्वाचे घटक आहेत. हार्दिक २०२४ पासून संघाचं नेतृत्त्व करत आहे, तर रोहित स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद जिंकलं आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू मिळून मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलमध्ये सहावं जेतेपद पटकावून देतील. मुंबई संघ २९ मार्च रोजी आयपीएल २०२६ च्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यांचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल.