भारतीय संघाने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत प्राथमिक फेरीचा अडथळा अजिंक्य राहून ओलांडला. सुपर८ लढतींसाठी भारतीय संघाचा सराव सुरू आहे. या सरावादरम्यान घडलेली एक घटना टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने लगावलेला एक फटका वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला लागला आहे.
शुक्रवारी सरावादरम्यान हा प्रकार घडला. जोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध हार्दिकचा फटका सिराजच्या पायाला लागला. जोरकस फटका असल्यामुळे सिराजला चांगलंच लागलं. नेट्समध्ये तो लंगडत चालत होता. सिराज अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात खेळला आहे. अन्य लढतीत जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना प्राधान्य देण्यात आलं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्याने तो वर्ल्डकप खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. तातडीने सिराजला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं. वर्ल्डकप संघात निवड न झाल्यामुळे सिराज सुट्टीसाठी स्पेनला रवाना होणार होता. मात्र त्याआधीच त्याला निरोप मिळाला. अवघ्या काही तासात तो भारतीय संघात सामील झाला.
अमेरिकेविरुद्धच्या लढतीत बरं नसल्यामुळे बुमराह खेळू शकला नाही आणि सिराजला संधी मिळाली. त्याने तीन विकेट्स पटकावत आपली निवड योग्य ठरवली. बुमराह फिट होताच सिराज राखीव खेळाडूंमध्ये गेला.
शुक्रवारी हार्दिकच्या फटक्यामुळे सिराजच्या गुडघ्याला मार बसला. फिजिओंनी तातडीने धाव घेत सिराजवर उपचार केला. हार्दिकसह संघातल्या खेळाडूंनी सिराजची विचारपूस केली.
स्पर्धेत विविध संघांना दुखापतींचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श दुखापतीमुळे महत्त्वपूर्ण दोन लढती खेळू शकला नाही. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाला. त्याच्याऐवजी सॅम टॉपिंगला संधी मिळाली. झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर सलामीच्या लढतीतच दुखापतग्रस्त झाला. त्याच्याऐवजी बेन करनची निवड झाली.
श्रीलंकेचा अष्टपैलू फिरकीपटू वानिंदू हासांरगा दुखापतग्रस्त झाल्यामुळे श्रीलंकेला डावपेचात बदल करावे लागले. त्यातच युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराणाही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने श्रीलंकेच्या अडचणीत भर पडली आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याऐवजी कोल मॅकहोनीला संघात समाविष्ट करण्यात आलं.
