Haris Rauf BREAKS Silence On Virat Kohli Iconic Sixes At MCG During T20 World Cup scsg 91 | Loksatta

“ते दोन सिक्स दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पंड्याने मारले असते तर…”; विराटच्या त्या षटकारांबद्दल हॅरिस रौफ पहिल्यांदाच बोलला

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १९ व्या षटकात शेटवच्या दोन चेंडूंमध्ये विराटने लगावलेले ते दोन षटकार आजही चर्चेत

“ते दोन सिक्स दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पंड्याने मारले असते तर…”; विराटच्या त्या षटकारांबद्दल हॅरिस रौफ पहिल्यांदाच बोलला
१९ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर विराटने लगावलेले षटकार (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा अजूनही सुरु आहे. खास करुन स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने केलेली खेळी आजही या ना त्या कारणाने चर्चेत असते. मेलबर्नच्या क्रिकेट मैदनावर विराटने भारताला पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध रोमहर्षक विजय मिळून दिला आहे. पाकिस्तानी संघातील वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला विराटने शेवटून दुसऱ्या षटकामध्ये दोन खणखणीत षटकार लगावत भारताला विजयाच्या जवळ नेण्यात आणि शेवटच्या षटकात विजय मिळून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

१९ व्या षटकामधील विराटचे हे षटकार टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फटक्यांपैकी असल्याचं यापूर्वीही अनेकांनी म्हटलेलं असतानाच आता खुद्द हॅरिसनेही या षटकांबद्दल भाष्य केलं आहे. विराट कोहली वगळता इतर कोणाला ते फटके मारता आले नसते अशा अर्थाचं विधान हॅरिसने केलं आहे. हॅरिसने विराटची ही फटकेबाजी म्हणजे ‘क्लास’ दर्जाची फलंदाजी होती असं म्हटलं आहे.

“मी भारताविरुद्ध नियोजित योजनेनुसार गोलंदाजी केली. मात्र विराटने मारलेले ते दोन षटकार म्हणजे त्याच्या फलंदाजीचा दर्जा दाखवून देणारे फटके होते. तेच षटकार दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पंड्याने मारले असते तर मला वाईट वाटलं असतं. मात्र ते विराटने मारले यातच त्याच्या फलंदाजीचा दर्जा दिसून येतो. ते फटके अगदी ‘क्लासिक’ होते,” असं हॅरिस रौफने म्हटलं आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने २४ ऑक्टोबर रोजी खेळलेल्या आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अगदी शेवटच्या चेंडूवर पराभूत केलं अन् भारतात दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली होती. या सामन्यातील १९ वं षटक हॅरीस रौफने टाकलं होतं. या षटकामध्ये त्याने पहिले चार चेंडू उत्तम टाकले. हे चारही चेंडू पंड्या खेळला. मात्र त्याला षटकार लगावता आला नाही. चौथ्या चेंडूवर एक धाव काढून विराट फलंदाजीला आला तेव्हा ८ चेंडूंमध्ये २८ धावा आवश्यक होत्या. कोहलीने १९ व्या षटकाचा पाचवा चेंडू सरळ षटकार लगावला. तर सहाव्या चेंडूवर लेग साईडला हूकचा फटका मारत चेंडू थेट सीमापार धाडला. विराटच्या या फटकेबाजीमुळे शेवटच्या षटकामध्ये भारताला केवळ १६ धावांचं आव्हान उरलं. विराटने मारलेल्या या दोन षटकांरांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला होता. या षटकारांसाठी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनेही विराटचं तोंड भरुन कौतुक केलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 08:35 IST
Next Story
Fifa World Cup 2022 : टय़ुनिशियाकडून फ्रान्सचा पराभव