क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक चेंडूवर रन्स बनवणं आणि रन्स वाचवणं या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात, तिथे असे उत्तम क्षेत्ररक्षणाचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. भारत विरुद्ध इंग्लंड महिला संघांमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडू हरलीन देओलनं देखील अशाच प्रकारच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा अद्भुत नमुनाच पेश केला. खुद्द उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करून हरलीन देओलच्या या भन्नाट कॅचचं कौतुक केलं आहे. हरलीन देओलच्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा स्पेशल इफेक्ट तर नाही ना?

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हरलीनच्या क्षेत्ररक्षणाचं अद्भुत कौशल्य दिसून येत आहे. या व्हिडीओवर आनंद महिंद्रा म्हणतात, “नाही. हे शक्य नाही. हे नक्कीच झालेलं नसणार. हा काहीतरी स्पेशल इफेक्ट असेल. काय? हे खरं आहे? ओके. मग तुम्ही गॅल गॅडोतला विसरा. खरी वंडर वुमन इथे आहे…” असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे. हरलीनच्या या कौशल्याचं सर्वच क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे.

नेमकं झालं काय?

शुक्रवारी रात्री भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना पार पडला. या सामन्यामध्ये १९व्या ओव्हरमध्ये इंग्लंडची स्थिती ४ बाद १६६ अशी भक्कम होती. अॅमी जोन्स ही इंग्लंडची फलंजाज २६ चेंडूंत ४३ धावा फटकावून भारतीय गोलंदाजीची पिसं काढण्याच्या तयारीत होती. समोर शिखा पांडे १९वी ओव्हर टाकत होती. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अॅमी जोन्सनं शिखाला उत्तुंग षटकार खेचण्याच्या इराद्याने बॉल सीमारेषेच्या दिशेनं टोलवला. बॉल बराच उंच गेल्यानंतर थेट सीमारेषेजवळ खाली आला. तिथे क्षेत्ररक्षण करत होती हरलीन देओल!

दोन वेळा घेतला अप्रतिम झेल!

आता षटकार मिळणार या अपेक्षेत असलेल्या इंग्लंडच्या चमूला हरलीननं जोरदार झटका दिला! सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षणच नाही तर उत्कृष्ट कॅच टिपण्याचं कसब हरलीन देओलनं दाखवलं. आधी सीमारेषेच्या आत तिनं एक अप्रतिम कॅच घेतला. पण तोल जाऊन सीमारेषेबाहेर जातोय असं लक्षात येताच तिनं चेंडू पुन्हा हवेत फेकला. सीमारेषेबाहेर जाऊन पुन्हा आत डाईव्ह मारत दुसऱ्यांदा अप्रतिम झेल टिपला.

 

हरलीन देओलच्या या अप्रतिम कौशल्यावर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी देखील हा व्हिडीओ ट्वीट करून हरलीनचं कौतुक केलं आहे.

 

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. “तो एक अप्रतिम कॅच होता हरलीन. माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर होता”, असं सचिन या ट्वीटमध्ये म्हणतो.