नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगची सलग दुसऱ्या वर्षी ‘एफआयएच’ सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. यावर्षी ‘एफआयएच’चा पुरस्कार मिळवणारा हरमनप्रीत तिसरा भारतीय खेळाडू ठरला. सलग दोन वर्षे सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार पटकावणारा हरमनप्रीत चौथा खेळाडू आहे. यापूर्वी टेऊन डी नूएर (नेदरलँड्स), जेमी डायर (ऑस्ट्रेलिया) आणि आर्थर व्हॅन डोरेन (बेल्जियम) यांनी सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळविला होता.

‘‘हरमनप्रीत आधुनिक काळातील अव्वल हॉकीपटू आहे. तो उत्कृष्ट बचावपटू असून स्टिकमध्ये चेंडू खेळवत ठेवण्याचेही त्याच्यात कौशल्य आहे,’’ अशा शब्दांत ‘एफआयएच’ने हरमनप्रीतचे कौतुक केले आहे. भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीतने यंदाच्या ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या १६ सामन्यांत १८ गोल केले. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या सहा सामन्यांत  त्याने आठ गोल केले होते.