Captain Harmanpreet Kaur Record in T20I: भारताची वर्ल्डकप विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने टी-२० मध्ये इतिहास घडवला आहे. सध्या सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने या मालिकेतील सुरूवातीचे ३ सामने एकतर्फी जिंकत मालिकाही ३-०ने नावे केली. तिसऱ्या सामन्यातील विजयासह कर्णधार हरमनप्रीत कौरने टी-२० क्रिकेटमध्ये आपलं नाव सोनेरी अक्षरात उमटवलं आहे.

भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवत आपला दबदबा कायम राखला. भारताने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ ११२ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने शफाली वर्माच्या ७९ धावांच्या खेळीच्या बळावर १३.२ षटकांत सामना जिंकला.

तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारताने सर्वाधिक ७७ सामने जिंकले आहेत. सर्वाधिक टी-२० सामने संघाला जिंकवून देणारी हरमनप्रीत कौर जगातील पहिली कर्णधार ठरली आहे.

हरमनप्रीत कौरच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर होता. लॅनिंगने १०० पैकी ७६ सामने जिंकले आहेत. हरमनप्रीतने आता तिला मागे टाकत ७७ सामने जिंकले आहेत. लॅनिंगने ऑस्ट्रेलियाला चार टी-२० विश्वचषक जिंकून दिले आहेत. ऑस्ट्रेलियाने २०१४, २०१८, २०२० आणि २०२३ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील टी-२० विश्वचषकात भारताची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे संघ २०२० मध्ये उपविजेता ठरली. त्या वर्षी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

महिला टी-२० मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय

७७ – हरमनप्रीत कौर (१३० सामने)*

७६ – मेग लॅनिंग (१०० सामने)

७२ – हीदर नाईट (९६ सामने)

६८ – चार्लोट एडवर्ड्स (९३ सामने)

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर, भारतीय संघ फेब्रुवारीमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. त्यानंतर संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला जाईल. इंग्लंडचा दौरा टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. जून-जुलै २०२६ मध्ये महिला टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे आणि या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे असणार आहे.