Harmanpreet Kaur Most Matches Record: येत्या काही दिवसात आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवून दमदार सुरुवात केली. पण त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने हा सामना गमावला असला तरीदेखील, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेला तिसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. हरमनप्रीत कौर ही तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू ठरली आहे. इंग्लंडविरूद्ध झालेला हा सामना तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३६८ वा सामना ठरला. या रेकॉर्डमध्ये तिने न्यूझीलंडच्या सूजी बेट्सला मागे टाकलं आहे. सूजी बेट्सच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६७ सामने खेळण्याची नोंद आहे.

आता या रेकॉर्डच्या यादीत हरमनप्रीत कौरचं नाव सर्वात वर आहे. तिला भारतीय संघाकडून १६४ वनडे, १६४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि ७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. याआधी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड माजी कर्णधार मिताली राजच्या नावे होता. तिने ३३३ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

हरमनप्रीत कौरला २००९ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. झुलन गोस्वामीच्या नेतृत्वात तिला पाकिस्तानविरूद्ध पदार्पणाची संधी मिळाली होती. पण पदार्पणाच्या सामन्यात तिला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात तिला पहिल्यांदाच फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पदार्पणात तिला अवघ्या ८ धावा करता आल्या होत्या. आतापर्यंत तिला ७ कसोटी सामन्यांमध्ये २३० धावा करता आल्या आहेत. यादरम्यान तिने १ अर्धशतक झळकावलं आहे. १६४ वनडे सामन्यांमध्ये तिने ४५४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने ७ शतकं आणि २४ अर्धशतकं झळकावले आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १९७ सामन्यांमध्ये त्याने ४०७५ धावा केल्या आहेत.