लॉर्ड्सच्या मैदानावर आजवर अनेक ऐतिहासिक सामने खेळवले गेले आहेत. पण गेल्या १४२ वर्षांपासून या मैदानावर महिलांचा एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवला गेला नव्हता. अखेर या मैदानावर पहिला आणि ऐतिहासिक कसोटी सामना खेळण्याचा मान भारतीय महिला संघाला मिळाला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. यादरम्यान भारतीय संघातील फलंदाजांनी पहिल्याच दिवशी दमदार फलंदाजी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने दमदार अर्धशतकं झळकावली. या सामन्यात अर्धशतकी खेळी करताच, हरमनप्रीत कौरने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यातील सुरुवातीला भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले होते. यस्तिका भाटीया आणि शफाली वर्मा स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जने मिळून भारताचा डाव सावरला. स्मृतीने अर्धशतकी खेळी केल्यानंतर, हरमनप्रीत कौरने देखील अर्धशतक झळकावलं. यासह ती लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वनडे, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकवणारी पहिलीच भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. हा रेकॉर्ड आजवर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजांना देखील करता आलेला नाही. यासह ती लॉर्ड्सच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये अर्धशतकी खेळी करणारी जगातील चौथी फलंदाज ठरली आहे. या यादीत तिच्यापुढे केवळ युनिस खान, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारासारख्या दिग्गज खेळाडूंचं नाव आहे. आता या दिग्गजांच्या यादीत हरमनप्रीत कौरचं नाव जोडलं गेलं आहे.

भारतीय संघाची दमदार सुरुवात

या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने ७४.५ षटकात २८५ धावा केल्या आहेत. भारताकडून स्मृती मानधनाने १०८ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची खेळी केली. तिचं शतक थोडक्यात हुकलं. हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३०० वा सामना आहे. यासह ती सर्वात कमी वयात ३०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. स्मृतीने ५० चेंडूंचा सामना करत अर्धशतकी खेळी केली. यासह ती कसोटी क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर अर्धशतकी खेळी करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली.

तर हरमनप्रीत कौरने १२१ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ७ चौकार खेचले. तर दीप्ती शर्माने देखील ८७ चेंडूंचा सामना करत ५७ धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून गोलंदाजी करताना सोफी एक्लेस्टनने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर लॉरेन फिलर आणि एस्सी वाँगने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. भारताचा डाव २८५ धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ५ षटकात १ गडी बाद १३ धावा केल्या आहेत.