Harmanpreet Kaur Record: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हरमनप्रीत कौर सध्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृ्त्व करत आहे. गुजरात जायंट्स संघाविरूद्ध खेळताना मुंबई इंडियन्सने विक्रमी १९३ धावांचा यशस्वी पाठलाग केला. या धावांचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरने नाबाद ७१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर तिने एख मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हरमननने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत खेळताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. तिच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सच्या विजयाचा आनंद द्विगुणित झाला आहे.
अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच
या सामन्यात पहिल्या फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात जायंट्सने १९२ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हरमनने आक्रमक सुरूवात केली आणि शेवटपर्यंत उभी राहिली. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी तिला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अवघ्या काहीच धावांची गरज होती. तिने फलंदाजीला येताच चौकार षटकारांचा पाऊस पाडला आणि हा मैलाचा दगड गाठला. असा विक्रम करणारी ती पहिलीच भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. याआधी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तिच्याच नावे होता.
हरमनप्रीतने या स्पर्धेतील पहिल्या हंगामापासूनच मुंबईच्या फलंदाजीची एक बाजू धरून ठेवली आहे.तिच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे, कितीही दबाव असला तरीदेखील ती सयंम ठेवून फलंदाजी करते आणि योग्यवेळी योग्य फटका मारते. त्यामुळेच ती हा मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकली आहे. असा कारनामा इतर कुठल्याही भारतीय महिला फलंदाजाला करता आलेला नाही.
महिला प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत ती दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तिच्या नावे १०१६ धावा करण्याची नोंद आहे. या यादीत अव्वल स्थानी असलेल्या नेट सिव्हर ब्रंटने ११०१ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या मेग लेनिंगने ९९६ धावा केल्या आहेत. मेग लेनिंगकडेही १००० धावांचा पल्ला गाठण्याची संधी आहे. एलिस पेरीने ९७२ धावा केल्या आहेत. तिने या हंगामापूर्वी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. तर शफाली वर्माच्या नावे ८८७ धावा करण्याची नोंद आहे.
