Harmanpreet Kaur Record In WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला दमदार सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

स्पर्धेतील सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. गतविजेत्या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण लॉरेन बेलच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईला हवी तशी सुरूवात करता आली नाही. मुंबईला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले. अमेलिया केर आणि सिव्हर ब्रंट स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जी कमलिनीने मिळून संघाचा डाव सावरला. कमलिनीने ३२ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने २० धावा केल्या. ती मोठी खेळी करू शकली नाही, पण २० धावांसह ती महिला प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचली आहे.

हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीग स्पर्धेत फलंदाजी करताना ८७१ धावा केल्या आहेत. यासह ती महिला प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज ठरली आहे. या विक्रमात तिने शफाली वर्माला मागे टाकलं आहे. शफाली वर्माच्या नावे ८६५ धावा करण्याची नोंद आहे. आता हरमनप्रीत कौर ही महिला प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणीरी भारतीय फलंदाज ठरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तिने ६४६ धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी असलेल्या ऋचा धोषने ६२५ धावा केल्या आहेत.

मुबंईने पहिल्या डावात केल्या १५४ धावा

नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सुरू असेलल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर ६ गडी बाद १५४ धावा केल्या आहेत. मुंबईकडून फलंदाजी करताना सजीवन सजनाने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर निकोला कॅरीने ४० आणि जी कमलिनीने ३२, हरमनप्रीत कौरने २० धावांची खेळी केली.