Harmanpreet Kaur Record: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३० वा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना भारतीय संघासाठी सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांअखेर १७० धावा केल्या. हरमनप्रीत कौरने यादरम्यान अवघ्या २५ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तिच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.

जेव्हा जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा हरमनप्रीत कौर खंबीरपणे उभी राहते. भारतीय संघाला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. पण त्यानंतर विकेट्स पडल्यामुळे भारतीय संघाचा डाव गडबडला होता. त्यावेळी हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जने मिळूने भारतीय संघाचा डाव सांभाळला. यादरम्यान हरमनप्रीत कौरने २५ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह ती आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारी भारतीय खेळाडू ठरली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेल्या स्मृती मानधना आणि शफाली वर्माने दमदार सुरुवात करुन दिली. शफालीने ३४ आणि स्मृतीने ३८ धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ३४ धावांची खेळी केली. तर शेवटी हरमनप्रीत कौरने तुफान फटकेबाजी करत लागोपाठ ३ षटकार खेचत २५ चेंडूंमध्ये जलद अर्धशतक झळकावलं. तिने या डावात २७ चेंडूंमध्ये ५६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १७० धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १७१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण, शेवटी एलिस पेरी आणि अॅशले गार्डनरने मिळून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. पेरीने ५६ धावांचे योगदान दिले. तर गार्डनरने ५३ धावांवर नाबाद राहून ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. या पराभवासह भारतीय संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे.