वुमन्स प्रीमियर लीग २०२६ अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या ९ जानेवारीपासून WPL 2026ला सुरूवात होत आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाची पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार हरमनप्रीत कौरने वर्ल्डकप जिंकल्यानंतर काय बदल झाला हे सांगितलं.

मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेसाठी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर, नवीन कोच लिसा केइटली आणि गोलंदाजी कोच झुलन गोस्वामी उपस्थित होत्या. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वनडे विश्वचषक २०२५ चे जेतेपद पटकावलं. मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात संघाने हा दणदणीत विजय मिळवला.

विश्वचषक जिंकल्यानंतर आयुष्य काय बदल झाले? यावर हरमनप्रीत कौर म्हणाली, “पूर्वीपेक्षा जास्त बिझी झालीये. नाहीतर प्रत्येक वर्ल्डकपनंतर काही न करता घरात बसून असायची. पण वर्ल्डकप जिंकल्यानंतर आता खूप बिझी झालीये, कारण सर्वांना जाणून घ्यायचं आहे की हा सीझन कसा होता, आम्ही कसा विचार करत होतो, नेमकं काय केलं… जेतेपद पटकावण्यासाठी आम्ही कशी तयारी केली., हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. खूप बिझी आहे खरंतर पण मी एन्जॉय करतेय.”

हरमनप्रीत कौरने मुंबई इंडियन्सला स्पर्धेचे दोन वेळा जेतेपद पटकावून दिलं आहे. यानंतर आता हरमनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वर्ल्डकप देखील जिंकला. ही तिन्ही जेतेपद हरमनने मुंबईत पटकावली. मुंबईत तू तुझं बेस्ट क्रिकेट खेळतेस, याबद्दल काय सांगशील… यावर बोलताना हरमन म्हणाली, “मुंबई माझ्यासाठी कायमच खास शहर राहिलं आहे. माझा पहिला जॉबसुद्धा मुंबईतच होता. मुंबई माझ्यासाठी स्पेशल शहर आहे. जेव्हाही मुंबईत सामना खेळण्याची संधी मिळाली आहे, तेव्हा नेहमीच सकारात्मक निर्णय पाहायला मिळाला आहे. यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगची सुरूवात सुद्धा मुंबईतच होत आहे. त्यामुळे हे वर्षसुद्धा स्पेशल असणार आहे. गेलं पूर्ण वर्ष महिला क्रिकेटसाठी खूप चांगलं ठरलं. हे वर्षदेखील असंच असेल अशी आशा करते.”