‘हा तुझा शेवटचा वर्ल्डकप आहे का’? या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर भडकली. टीम इंडिया इंग्लंडमध्ये आयोजित टी२० वर्ल्डकपसाठी सज्ज होत आहे. यानिमित्ताने आयोजित कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत ही शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. १२ जूनपासून टी२० वर्ल्डकप सुरू होत आहे. गेल्या वर्षी हरमप्रीतच्या नेतृत्वातच भारतीय संघाने वनडे वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला होता.

आयसीसीतर्फे आयोजित ‘कॅप्टन्स डे’ कार्यक्रमात सर्व संघांच्या कर्णधार सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान पत्रकाराने ३७वर्षीय हरमनप्रीतला निवृत्तीविषयी विचारलं. या प्रश्नावर हरमनप्रीतने पत्रकारालाच गुगली टाकला. मिश्कील हास्यासह हरमनप्रीतने पत्रकारालाच गोंधळात टाकलं. हरमनप्रीत आणि पत्रकार यांच्यात नेमका काय संवाद झाला ते जाणून घेऊया.

पत्रकार- हरमनप्रीत हा तुझा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे का?
हरमनप्रीत- का?
पत्रकार- मी फक्त विचारतोय (हसत) केवळ विचारतोय. शेवटचा वर्ल्डकप नसेल तर चांगलंच आहे.
हरमनप्रीत- मी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं का?
पत्रकार- अजिबातच नाही. मी फक्त विचारलं.
हरमनप्रीत- मग तुम्ही असा प्रश्न का विचारला?
पत्रकार- फक्त विचारलं.

सोशल मीडियावर हरमनप्रीतचं उत्तर चांगलंच व्हायरल होत आहे. भारतीय संघ वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने करत आहे. वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ‘वर्ल्डकपपूर्वी आम्ही दोन सराव सामने खेळणार आहोत. आमची तयारी चांगली सुरू आहे. राधाने वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत चांगली कामगिरी केली. भारती फुलमाली ही मधल्या फळीत खेळणारी खेळाडू आहे. तीही चांगल्या फॉर्मात आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेत आहोत. आमची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याचा आम्हाला अंदाज आला आहे’, असं हरमनप्रीतने सांगितलं.

भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हरमनप्रीतच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टी२० लढतीनंतर हरमनप्रीतने न्यूझीलंडच्या सुजी बेट्सचा विक्रम मोडला.