Harmanpreet Kaur Statement After Australia Defeat: वनडे चॅम्पियन असलेल्या भारतीय महिला संघाला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये गट टप्प्यातून बाहेर पडावं लागलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत महिला टी-२० विश्वचषकातील भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक होतं, मात्र फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील महत्त्वाच्या चुका संघाला महागात पडल्या. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने भारताच्या खराब कामगिरीबाबत वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाल्याने आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं. पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यात बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अपयश आल्याने भारतीय संघाच्या मोठ्या स्पर्धांमधील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर भारताच्या या पराभवानंतर काय म्हणाली जाणून घेऊया.

हरमनप्रीत कौरचं भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर मोठं वक्तव्य

सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवाची कारणं स्पष्टपणे मान्य करत संघाच्या कामगिरीवर आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली. बलाढ्य संघांविरुद्ध भारत सातत्याने अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्याचं तिने सांगितलं. शेवटच्या षटकांमध्ये जास्त धावा देणं, धावांचा पाठलाग करताना आवश्यक गतीने फलंदाजी न होणं आणि महत्त्वाच्या क्षणी झेल सोडणं या चुका भारताला महागात पडत असल्याचं हरमनप्रीतने नमूद केलं. आगामी स्पर्धांमध्ये अशा चुका टाळण्यासाठी संघाने आपल्या रणनीतीचा आणि खेळाचा सखोल आढावा घेण्याची गरज असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

भारताच्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभवानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, “अखेरीस आम्ही धावफलकावर समाधानकारक धावसंख्या उभारली होती. मी फलंदाजी करत असताना मात्र आम्ही थोड्या धावा कमी केल्याचं वाटत होतं. पण अखेरच्या दोन षटकांत आम्ही चांगल्या धावा जोडल्या.”

“संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर बलाढ्य संघांविरुद्ध आम्ही अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही. सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळताना तुमच्याकडूनही सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असते. याबाबत आम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. त्यांनी आपल्या नियोजनानुसार अचूक गोलंदाजी केली. आम्ही फार विकेट्स गमावल्या नाहीत, पण अपेक्षित वेगाने धावाही करता आल्या नाहीत,” असं हरमनप्रीत पुढे म्हणाली.

“हा चांगला सामना होता, पण दुर्दैवाने आम्ही विजयापर्यंत पोहोचू शकलो नाही. काही झेल सुटल्याचा फटका आम्हाला बसला. तरीही आज आम्ही सामन्यात होतो. मात्र आमच्या दर्जानुसार खेळता आलं नाही. संघ म्हणून आम्हाला अनेक गोष्टींचा पुन्हा विचार करावा लागेल. विशेषतः बलाढ्य संघांविरुद्ध कसं खेळायचं, यावर अधिक काम करण्याची गरज आहे. अनेकदा आम्ही सामना जिंकण्याच्या स्थितीत असतो, पण शेवटच्या काही षटकांत खूप धावा देतो आणि धावांचा पाठलाग करताना त्याच धावा काढण्यात अपयशी ठरतो. ही समस्या बऱ्याच काळापासून कायम आहे,” असं हरमनप्रीत कौरने अखेरीस म्हटलं.