Harmanpreet Kaur Stepped down as India women’s Captain across all Three Formats: भारताला महिला विश्वचषक जिंकून देणारी एकमेव कर्णधार हरमनप्रीत कौरने मंगळवारी तात्काळ प्रभावाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सविस्तर पोस्ट करत ही घोषणा केली. बीसीसीआय सह झालेल्या रिव्ह्यू मीटिंगनंतर हरमनप्रीत कौरने हा मोठा निर्णय जाहीर केला.

भारताच्या सर्वकालीन महान क्रिकेटपटूंमध्ये गणली जाणारी हरमनप्रीत कौर २०२२ मध्ये मिताली राजच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची पूर्णवेळ कर्णधार बनली. त्याआधीही ती संघाची उपकर्णधार म्हणून वेळोवेळी संघाचं नेतृत्व करत होती. कर्णधार म्हणून तिचा शेवटचा सामना मागील महिन्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळला गेला. तिच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान, हरमनप्रीतने स्पष्ट केलं आहे की, ती यापुढेही तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.

हरमनप्रीत कौरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की,
आज मी सर्व फॉरमॅटमधील भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडत आहे.
हा निर्णय घेणं माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. या निर्णयाबरोबर अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर मनात कोरल्या गेलेल्या असंख्य क्षणांचा समावेश आहे.

मी या संघासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझ्याकडचं सर्वस्व दिलं आहे. माझं रक्त, घाम, वेळ आणि अनेकदा माझ्या स्वतःच्या खेळाचा तसेच वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचाही त्याग केला आहे. काही प्रसंगी मला माझी वैयक्तिक कामगिरी, स्वतःची प्रगती आणि माझ्या मनात असलेल्या इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण माझ्यासाठी संघ नेहमीच सर्वांत आधी होता.

कर्णधार म्हणून मला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले. हे निर्णय नेहमीच सर्वांना समजले नाहीत, ते घेणंही सोपं नव्हतं आणि काही निर्णयांची वैयक्तिक किंमतही मला मोजावी लागली. पण माझ्या प्रत्येक निर्णयामागे एकच उद्देश होता, या संघाला अधिक चांगलं बनवणं आणि इतर खेळाडूंना स्वतःचा खेळ उंचावण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःमधील सर्वोत्तम खेळाडू घडवण्याची संधी देणं.

मी सगळं पाहिलं आहे.
संघाचे सर्वांत कठीण क्षण, हृदय पिळवटून टाकणारे पराभव, टीका, शंका आणि काहीही आपल्या बाजूने घडत नसल्यासारखे वाटणारे दिवसही मी अनुभवले आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च आनंदाचे क्षणही अनुभवले, विजय, जल्लोष, देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आणि प्रत्येक त्याग सार्थ ठरवणारे क्षणही पाहिले.

आज मी कर्णधारपद सोडत आहे. मनात असंख्य भावना आहेत, पण त्याचवेळी मनात एक प्रकारची शांतताही आहे. कारण माझा माझ्या संघावर मनापासून विश्वास आहे. हा संघ प्रतिभावान आहे, त्याच्यात जिद्द आहे, आत्मविश्वास आहे आणि त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. या संघाचा पुढचा प्रवास पाहण्यासाठी आणि त्याचा एक भाग राहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
मला वाटतं, मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे.

मी या संघाला माझ्याकडचं सर्वस्व दिलं. ही जबाबदारी अभिमानाने सांभाळली आणि भारतीय महिला क्रिकेटचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, यासाठी मी कायमच कृतज्ञ राहीन. आता माझ्यासाठी आयुष्याचं एक नवं पान उलटण्याची वेळ आली आहे.
आज कर्णधारपदाची भूमिका संपत आहे, पण भारतीय क्रिकेटवरील माझं प्रेम कधीच संपणार नाही.

माझ्या प्रत्येक सहकाऱ्याचे, प्रशिक्षकांचे, सपोर्ट स्टाफचे, व्यवस्थापनाचे, बीसीसीआयचे, कुटुंबीयांचे आणि चांगल्या-वाईट प्रत्येक काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येक चाहत्याचे मनापासून आभार.
रक्त. घाम. त्याग. अभिमान. – मी माझ्याकडचं सर्व काही दिलं.
आता पुन्हा एकदा केवळ या खेळावरील प्रेमासाठी मैदानात उतरण्यासाठी मी सज्ज आहे.
कर्णधाराची भूमिका संपली, पण प्रवास सुरूच आहे.

हरमनप्रीतने भारताचं पाच कसोटी, ५१ वनडे आणि तब्बल १५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठं यश गेल्या वर्षी मिळालं, जेव्हा तिच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच महिला विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्याआधी उपांत्य फेरीत भारताने स्पर्धेतील प्रबळ दावेदार आणि विक्रमी पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं.

हरमनप्रीत ही एकूणच ५० षटकांच्या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवणारी कपिल देव आणि एमएस धोनीनंतरची भारताची तिसरी कर्णधार ठरली आहे. तसेच, कर्णधार म्हणून भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तिचा समावेश आहे. रोहित शर्माने २०२४ मध्ये, तर सूर्यकुमार यादवने २०२६ मध्ये पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून दिलं.

हरमनप्रीतने भारताचं १५५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलं आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये मिळून कोणत्याही खेळाडूच्या कर्णधारपदाच्या सामन्यांपेक्षा ही संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय, तिने एकूण २१० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, हीदेखील पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आहे.