Harmanpreet Kaur Creates World Record T20I Captaincy: महिलांच्या टी-२० आशिया चषक २०२६ मध्ये आज हायव्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हा सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक पाकिस्तान संघाने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. यादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवत विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

भारत-पाकिस्तान सामना हा कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक १५०वा सामना आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्त्व करणारी हरमनप्रीत कौर ही जगातील पहिली कर्णधार ठरली आहे. फक्त महिला क्रिकेट नव्हे तर पुरूषांच्या क्रिकेटमध्येही सर्वाधिक १५० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारी ती पहिली खेळाडू आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने २०१२ मध्ये सर्वप्रथम टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व स्वीकारलं आणि तेव्हापासून ती ही जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-२० आशिया चषक २०२६ सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच तिने इतिहास घडवला; पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १५० टी-२० सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारी ती जगातील पहिलीच खेळाडू ठरली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत खेळलेल्या १४९ टी-२० सामन्यांपैकी ८७ सामने जिंकले आहेत आणि ५७ सामने गमावले आहेत, तर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.

टी-२० प्रकारात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आधीच नावावर असलेल्या हरमनप्रीतने, आपल्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर कर्णधार म्हणून ३,३०१ धावा केल्या आहेत; या कामगिरीमुळे महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ती दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या खेळाडू

हरमनप्रीत कौर (भारत) – १५० सामने
चमारी अथापथू (श्रीलंका) – १२१ सामने
मारी बिमेन्यिमाना (रवांडा) – १०१ सामने
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) – १०० सामने
नारुएमोल चायवाई (थायलंड) – ९८ सामने

पुरुष क्रिकेटमध्ये, सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस याच्या नावावर आहे. इरास्मसने २०१९ ते २०२६ या काळात ९१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नामिबियाचं नेतृत्व केलं आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही श्रेणींचा समावेश असलेल्या एकूण यादीत तो आठव्या स्थानावर आहे.