Harmanpreet Kaur World Record INDW vs SAW: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज २१ जूनला भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ भिडत आहेत. हा सामना मॅनचेस्टरच्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड हा सामना खेळवला जात आहे. सुरूवातीचे दोन सामने जिंकत मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाच्या नजरा या सामन्यातही विजयावर असतील. त्यामुळे विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावण्यावर भारताच्या नजरा असणार आहेत. यासह या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास घडवला आहे.

भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्धचा सलामीचा सामना जिंकत विजयाने मोहिमेला सुरूवात केली, यानंतर नेदरलँड्सविरूद्ध संघाने दणदणीत विजय नोंदवला. यादरम्यान श्रेयंका पाटीलच्या रूपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. श्रेयंका पाटील पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेूतून बागेर झाली आहे. तिच्या जागी प्रेमा रावतला संघात सामील केलं आहे.

यादरम्यान आता भारताच्या महिला संघाला आयसीसी विश्वचषक जिंकून देणारी पहिली कर्णधार हरमनप्रीत कौरने हा सामना खेळण्यासाठी उतरताच इतिहास घडवला. हरमनप्रीत कौरचा हा कारकिर्दीतील २०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. यासह पुरूष आणि महिला क्रिकेटमध्ये २०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ती जगातील एकमेव खेळाडू ठरली आहे. पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगच्या नावावर आहे, ज्याने १६३ सामने खेळले आहेत.

महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडू

हरमनप्रीत कौर: २००
सुझी बेट्स: १८४
डॅनी व्याट: १८२
एलिस पेरी: १७७
स्मृती मानधना: १६८

पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू

पॉल स्टर्लिंग: १६३
रोहित शर्मा: १५९
जॉर्ज डॉकरेल: १५७
जोस बटलर: १५५
मोहम्मद नबी: १५२

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील कर्णधार हरमनप्रीत कौरची कामगिरी कशी राहिली आहे, पाहूया. हरमनने १९९ सामन्यांमधील १७८ डावांमध्ये ४,१२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिची सरासरी ३०.०९ इतकी राहिली आहे. या फॉरमॅटमध्ये हरमनने १७ अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं असून, तिची सर्वोच्च धावसंख्या १०३ धावा आहे. महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताची हरमनप्रीत कौर तिसऱ्या स्थानावर आहे.