पीटीआय, नवी दिल्ली : आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत सिंगचा आक्रमक खेळ आणि ड्रॅग-फ्लिकिंग हेच भारतीय संघाचे मुख्य अस्त्र ठरेल, असे मत माजी हॉकीपटू आणि यशस्वी ड्रॅग-फ्लिकर जुगराज सिंगने नोंदवले आहे. हरमनप्रीतचा खेळ पाहिला की त्याच्यात माझेच प्रतिबिंब दिसते, असेही जुगराज म्हणाले.जुगराज सिंग यांची जडणघडण ज्या सुरजित हॉकी अकादमीत झाली, त्याच अकादमीतून हरमनप्रीतही तयार झाला आहे. हरमनप्रीतचा खेळ आणि खेळाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन पाहिला की मला माझ्या खेळण्याच्या दिवसांची आठवण होते. त्याची शैली अगदी माझ्यासारखीच आहे. त्याची खेळण्याची पद्धत आणि आक्रमकता मला माझीच आठवण करून देते, असे जुगराज म्हणाले.
‘‘तुला मैदानावर खेळताना पाहिले की मला मीच खेळत असल्यासारखे वाटते,’’ असे आपण हरमनप्रीतला अनेकदा सांगितल्याचेही जुगराज यांनी नमूद केले. हरमनप्रीतची विश्वातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर्समध्ये गणना केली जाते. ‘‘टोक्यो ऑलिम्पिकपासून तो शानदार खेळ करत आहे. जो खेळाडू संघाला गरज असताना सातत्याने चांगली कामगिरी करतो, तोच संघाचे मुख्य अस्त्र ठरतो. मला वाटते, तो खेळाडू हरमनप्रीत असेल,’’ असे जुगराज यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
जुगराज यांचीही गणना जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर्समध्ये केली जात होती. मात्र, २००३ मध्ये जालंधरजवळ झालेल्या एका कार अपघातामुळे त्यांच्या आशादायी कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. ‘‘मैदानाबाहेरून मी बर्याच गोष्टी टिपू शकतो आणि हरमनप्रीतला मार्गदर्शन करू शकतो. हरमनप्रीतही अनेकदा माझ्याशी आपल्या खेळातील सुधारणांबाबत चर्चा करतो,’’ असे जुगराज यांनी सांगितले.
राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशिया चषकापाठोपाठ ऑलिम्पिक पदकाचीही कसर भरून निघाली. आता विश्वचषक पदकाची प्रतीक्षाही संपेल. – जुगराज सिंग
