माजी मुंबईकर खेळाडू हरमीत सिंग आगामी टी-२० विश्वचषकात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. टी-२० विश्वचषकातील भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जेव्हा हरमीत सिंग वानखेडे स्टेडियमवर मैदानात उतरेल, तेव्हा तो क्षण त्याच्यासाठी केवळ एक सामना नसेल, तर घरच्या मैदानावर झालेली भावनिक पुनरागमनाची आणि स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची कहाणी असेल. भारतीय खेळाडू ते वर्ल्डकपसाठी एखाद्या देशाच्या राष्ट्रीय संघात स्थानमिळेपर्यंतचा हरमीतचा प्रवास हा खाचळग्यांचा होता, त्याच्या या प्रवासाचा आढावा घेऊया.
३३ वर्षीय डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंग याचे आयुष्य गेल्या काही वर्षांत पूर्णपणे बदललं आहे. भारत सोडून सुमारे सहा वर्षांपूर्वी अमेरिकेसाठी खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या करिअरला नवं वळण मिळालं. कधी काळी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज इयान चॅपेल यांनी ज्याला मोठा प्रतिभावान खेळाडू म्हणून गौरवले होते, तो हरमीत नंतर विविध वादांमध्ये अडकला. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांपासून ते २०१७ मध्ये अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर कार नेल्याच्या प्रकरणापर्यंत अनेक गोष्टी त्याच्या वाट्याला आल्या. मात्र, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयकडून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.
हरमीत सिंगने अमेरिकेला जाण्याचा निर्णय का घेतला?
हरमीत सांगतो की, पक्षपातीपणा आणि संघातील निवडीमागील राजकारण अखेर २०२० मध्ये त्याने अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्याच्यासाठी वैयक्तिक पातळीवर वेदनादायक ठरला. गेल्या वर्षी त्याचे वडील, जे रिअल इस्टेट व्यवसायात होते, हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावले. तर कोविड काळात तो आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकला नाही.
भारताचा १९ वर्षांखालील माजी क्रिकेटपटू गेल्या एका वर्षापासून अमेरिकेत राहत असून क्रिकेट खेळणं आणि क्रिकेटचे प्रशिक्षण देणे यासह अनेक विविध नोकऱ्या करत आपले जीवन जगत होता. यासोबत भारतात क्रिकेट खेळत असताना कारकिर्दीच्या सुरूवातीच्या टप्प्यावर आलेल्या त्या वाईट अनुभवांना विसरण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात हरमीतचा फोन वाजला. २०२१ मधील ती कधीच न विसरू शकणारी घटना होती. हरमीतच्या आईला करोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यासह त्यांना श्वासोच्छवासाचा गंभीर त्रासही होत होता. हरमीतला कसंही करून एक रेमडेसिव्हिर इंजेक्शनची व्यवस्था करण्यास कळवण्यात आले. त्याने या इंजेक्शनची व्यवस्थाही केली पण त्याच्या काही फायदा झाला नाही.
“शनिवारी होणाऱ्या सामन्याची मला खूप उत्सुकता आहे. पण यावेळी मैदानात माझे वडील नसतील,” हरमीत सिंगने द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. “मुंबईत मी खेळत असताना ते हमखास सामना पाहायला यायचे. आता माझे आई-वडील दोघेही माझ्यासोबत नाहीत. मात्र माझी बहीण आणि आमचं इतर कुटुंब मला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये असेल. आज ते इथे असते, तर त्यांना माझा किती अभिमान वाटला असता, याचा विचार करून मन भरून येतं.”
ऑगस्ट २०२४ मध्ये वर्क परमिट मिळाल्यानंतर हरमीतने अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही तो संघाचा भाग होता. मात्र हरमीत सांगतो की, जगाच्या एका टोकावर जाऊन नव्या संधी शोधणाऱ्या लाखो लोकांप्रमाणेच तोही स्थलांतरितांच्या द्विधा अवस्थेतून गेला आहे. परदेशात चांगल्या संधी मिळवण्याची किंमत मोजावी लागतेच.
“जेव्हा तुम्ही घराबाहेर पडून उपजीविकेसाठी झगडता, तेव्हा कुटुंब आणि मित्रांपासून दूर जावं लागतं. माझे आई-वडील त्रास सहन करत होते, याची मला जाणीव होती, पण तरीही मी काहीच करू शकत नव्हतो. वेळ वेगळी होती, परिस्थिती वेगळी होती. परदेशात गेलेल्या प्रत्येकाला एक गोष्ट कायम सलते, आई-वडिलांची योग्य काळजी घेता आली नाही, ही खंत आहे. हा विचारच मला सतत अस्वस्थ करत होता,” असे हरमीतने भावुकपणे सांगितले.
हरमीत सिंग रोहित शर्मा एकाच शाळेत
काही महिन्यांपूर्वी हरमीत मुंबईला आला होता. त्यावेळी तो बोरिवलीतील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये गेला. रोहित शर्मा व हरमीत सिंग दोघे एकत्रच या शाळेत शिकले आहेत. यावेळेस त्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आणि मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाड यांच्यासोबत सराव केला होता. त्याने आपले प्रशिक्षक दिनेश लाड यांची भेट घेतली आणि त्यांच्या फाउंडेशनला १० लाख रुपयांची देणगी दिली. ही संस्था तरुण क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षण देते.
“आम्ही खेळत असताना आमचे खर्च कुणीतरी दुसराच पूर्ण करत होता. मी कधीच शाळेची फी भरली नव्हती कुणीतरी मदतीला उभं होतं. आज देवाने मला अशी स्थिती दिली आहे की मी थोडीफार मदत करू शकतो. सरांच्या माध्यमातून भविष्यातील क्रिकेटपटू घडू शकतात,”१ असे हरमीतने सांगितले.
हरमीतने अंडर-१९ स्तरावर संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यासोबतही क्रिकेट खेळलं आहे. राजस्थान रॉयल्समध्ये खेळताना संजू सॅमसन त्याचा रूममेटही होता. वानखेडे स्टेडियमवर हरमीत अखेरचा २०१४-१५ खेळला होता, तेव्हा त्याने कर्नाटकविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या होत्या. आता नव्याने सुरुवात केल्यानंतर हरमीत पुन्हा वानखेडेच्या मैदानावर उतरणार आहे. त्याच्या संघात मुंबईचे माजी दोन खेळाडू सौरभ नेत्रावळकर आणि शुभम रांजणेदेखील आहेत, ज्यामुळे संघ अधिक मजबूत झाल्याचा त्याला विश्वास आहे.
