युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत

करोनाची बाधा झाल्यामुळे कर्णधार यश धूलसह सहा भारतीय खेळाडूंना आर्यलडविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले

तारूबा (त्रिनिदाद) : हर्नूर सिंग (१०१ चेंडूंत ८८ धावा) आणि मुंबईकर अंक्रिश रघुवंशी (७९ चेंडूंत ७९) या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील (१९ वर्षांखालील) दुसऱ्या साखळी सामन्यात आर्यलडचा १७४ धावांनी धुव्वा उडवला. सलग दुसऱ्या विजयासह भारताने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश केला.  

करोनाची बाधा झाल्यामुळे कर्णधार यश धूलसह सहा भारतीय खेळाडूंना आर्यलडविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. भारताच्या प्रथम फलंदाजीत हर्नूर-अंक्रिश यांनी २५.४ षटकांत १६४ धावांची सलामी दिली. हे दोघे माघारी परतल्यावर राज बावाने (६४ चेंडूंत ४२) एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्राचा राजवर्धन हंगर्गेकर (नाबाद ३९) व कर्णधार निशांत सिंधू (३६) यांनी फटकेबाजी केल्याने भारताने ५० षटकांत ५ बाद ३०७ धावांची मजल मारली.

प्रत्युत्तरात, आर्यलडने सुरुवातीपासून ठरावीक अंतराने गडी गमावले. स्कॉट मॅकबेथ (३२) आणि जॉश कॉक्स (२८) यांचा अपवाद वगळता आर्यलडच्या एकाही फलंदाजाने २० धावांचा टप्पा पार केला नाही. भारताकडून कौशल तांबे, अनीश्वर गौतम आणि गर्व सांगवान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ५ बाद ३०७ (हर्नूर सिंग ८८, अंक्रिश रघुवंशी ७९; मुझामिल शेर्झाद ३/७९) विजयी वि. आर्यलड : ३९ षटकांत सर्वबाद १३३ (स्कॉट मॅकबेथ ३२; कौशल तांबे २/८, अनीश्वर गौतम २/११)

’  सामनावीर : हर्नूर सिंग.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harnoor ankrish batting help to defeated ireland india in the semifinals zws

Next Story
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : मेदवेदेव, त्सित्सिपास सबालेंकाची आगेकूच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी