Harry Brook On India vs England Semi Final Match Turning Point: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथलने शतक झळकावत इंग्लंडला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. इंग्लंडने हा सामना अवघ्या ७ धावांनी गमावला. दरम्यान इंग्लंडला पहिल्या डावात केलेली एक चूक महागात पडली.
धावांचा डोंगर सर करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने २५४ धावांचा डोंगर जवळजवळ सर केला होता. पण शेवटी इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या ७ धावा दूर राहिला. इंग्लडकडून सलामीला आलेला फिल सॉल्ट अवघ्या ५ धावा करून माघारी परतला. तर जोस बटलर अवघ्या २५ धावांवर माघारी परतला. कर्णधार हॅरी ब्रुकदेखील अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. इंग्लंडकडून जेकब बेथल शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने अवघ्या ४८ चेंडूत १०५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ७ षटकार खेचले. त्याला विल जॅक्सची साथ मिळाली होती. पण शेवटच्या षटकात इंग्लंडचा संघ विजयापासून ७ धावा दूर राहिला.
इंग्लंडला ही एक चूक महागात पडली
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय इंग्लंडने सार्थ ठरवत अभिषेक शर्माला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर संजू सॅमसनही स्वस्तात बाद झाला होता. पण इंग्लंडच्या कर्णधाराने केलेली एक चूक संपूर्ण संघाला महागात पडली. तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना इंग्लंडकडून तिसरे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला. या षटकातील दुसराच चेंडू संजूने मिड ऑनच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक मिड ऑनला क्षेत्ररक्षण करत होता. त्याला सोपा झेल घेण्याची संधी होती. त्यावेळी संजू अवघ्या १५ धावांवर फलंदाजी करत होता. पण ब्रुककडून हा सोपा झेल सुटला. हा या सामन्यातील खरा टर्निंग पॉईंट ठरला. कारण संजूने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८९ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला.
पराभवानंतर हॅरी ब्रुक काय म्हणाला?
या सामन्यातील पराभवानंतर बोलताना हॅरी ब्रुक म्हणाला, “मी माझी चूक मान्य करतो. संजू सॅमसनचा झेल सोडणं ही माझी मोठी चूक आहे. आज आमचं क्षेत्ररक्षण म्हणावं तितकं दर्जेदार झालं नाही. आम्ही जो प्लॅन केला होता, त्याची अंमलबजावणी करण्यात चुका झाल्या आणि भारतीय फलंदाजांसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसमोर अशा चुका करणे आम्हाला परवडणारे नाही.”
