भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीतील सामना खेळवला जाणार आहे. हा सामना ५ मार्चला वानखेडे स्टेडियमवर होणार असून या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कर्णधार हॅरी ब्रूकने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. यादरम्यान त्याला जोस बटलरच्या फॉर्मबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
जोस बटलरने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६मध्ये २६, २१, ३, ३, ७, २, ० अशा धावा केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांत या फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून ओळख असलेला बटलर यंदा आपल्या नावाला साजेसा खेळ करताना दिसलेला नाही. ३५ वर्षीय माजी इंग्लंड कर्णधार हा संघातील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या नावावर १५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने तसेच फ्रँचायझी क्रिकेटमधील दांडगा अनुभव आहे. दोन वेळा विश्वविजेते ठरलेल्या इंग्लंडसाठी तो मुख्य फलंदाज ठरेल, अशी अपेक्षा होती. पण त्याचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे.
गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये यजमान भारताविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या उपांत्य सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, बटलरच्या फॉर्मबद्दल संघ अजिबात चिंतेत नाही. “त्याच्याशी फार बोलण्याची गरज भासत नाही. त्याला एकटं सोडा आणि कदाचित स्वतःच्या पद्धतीने खेळू देणं हेच सर्वोत्तम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो दमदार खेळाडू राहिला आहे, आपण सर्वांनी पाहिलंच आहे. मला हा प्रश्न हजारो वेळा विचारला गेला आहे, पण तो संघात का आहे यावर प्रश्नचिन्ह उभारण्याचं कोणतंही कारण नाही,” असं ब्रूकने उपांत्य सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
बटलरने आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळताना वानखेडेवर डझनभरपेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे या मैदानाच्या परिस्थितीशी तो पूर्णपणे परिचित आहे. त्याचा दांडगा अनुभव आणि परिस्थितीची जाण लक्षात घेता, भारतीय संघासाठी तो उपांत्य फेरीत धोकादायक ठरू शकतो. मात्र, अलीकडच्या काळात त्याचा फॉर्म खालावलेला दिसत आहे. विश्वचषकापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने शेवटच्या तीन सामन्यांत केवळ २०च्या आसपास धावा केल्या.
उपांत्य सामन्यासाठी वानखेडेची खेळपट्टी कशी असेल, याबाबत विचारले असता ब्रूक म्हणाला की तो प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्याशी चर्चा करेल. आकडेवारी पाहून आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन नाणेफेक जिंकल्यास काय निर्णय घ्यायचा, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. ब्रूक म्हणाला, “मला खरंच माहिती नाही. तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारत आहात. मला खेळपट्टीबद्दल फारसं काही कळत नाही. आज रात्री आणि उद्या सामन्यापूर्वी मी ‘बॅझ’शी चर्चा करेन. आम्ही आकडेवारी पाहू आणि नाणेफेक जिंकलो तर आधी काय करायचं याचा निर्णय घेऊ.”
