Harsha Bhogle On Vaibhav Sooryavanshi: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला फलंदाज आहे. वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत २ दमदार अर्धशतकं झळकावली. या मालिकेत सर्वाधिक धावा करुन त्याने मालिकावीर पुरस्कार पटकावला. या दौऱ्याहून परतल्यानंतर आता त्याच्याकडे देशांतर्गत क्रिकेटमधील मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोन संघाचा कर्णधार म्हणून इशान किशन, तर उपकर्णधार म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे. या निर्णयावर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
वैभव सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे, पण रेड बॉल क्रिकटमध्ये तो अजूनही स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही. असं असताना, त्याच्यावर मोठी जबाबदारी देण्यामागचं नेमकं कारण काय, हे अजूनही मला समजू शकलेलं नाही, असं मत हर्षा भोगले यांनी व्यक्त केलं आहे. हर्षा भोगले यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “वैभव सूर्यवंशीला वरिष्ठ रेड बॉल संघाचा कर्णधार बनवण्यामागचं लॉजिक काय? त्याने आतापर्यंत १२ डावांमध्ये १७.२५ च्या सरासरीने २०७ धावा केल्या आहेत. तो खूप टॅलेंटेड आहे आणि त्याची शिकण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. त्याचं रेड बॉल करिअर सुरुवातीच्या टप्प्यात आहे.”
वैभवला गेल्या काही महिन्यांमध्ये जास्तीत जास्त टी-२० आणि वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याला मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. वैभव फक्त १५ वर्षांचा आहे, त्यामुळे इतक्या कमी वयात त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवणं कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ईस्ट झोन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांना देखील संधी देण्यात आली आहे. हे दोन्ही स्टार गोलंदाज वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात खेळताना दिसून येणार आहेत. तसेच वैभव सूर्यवंशी अभिमन्यू ईश्वरनसोबत डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी असा आहे ईस्ट झोनचा संघ:
इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, कुमार कुशाग्र, विराट सिंग, अनुकूल रॉय, सुदीप घरामी, शिखर मोहन, सुब्रांशु सेनापती, अभिजीत सरकार, डेनिश दास, मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद आणि सूरज जैस्वाल
