नवी दिल्ली : उदयोन्मुख भारतीय वेटलिफ्टिंगपटू महाराष्ट्राच्या हर्षदा गरुडने आशियाई युवा आणि कनिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

१८ वर्षीय हर्षदाने १५७ किलो (६९ किलो  ८८ किलो) वजन उचलले. कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील १५३ किलोच्या (७० किलो  ८३ किलो) कामगिरीहून हर्षदाची कामगिरी ही चार किलोहून सरस राहिली.

युवा विभागातील ४५ किलो वजनी गटात सौम्या दळवीने कांस्यपदक जिंकले. युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सौम्याने १४५ किलो (६३ किलो ८२ किलो) वजन उचलले. पुरषांच्या ४९ किलो वजनी गटात एल. धनुशने स्नॅच विभागात (८५ किलो) चमक दाखवत कांस्यपदक पटकावले. १८५ किलोसह (८५ किलो  १०० किलो) तो एकूण चौथ्या स्थानावर होता. आंतरखंडीय आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्नॅच तसेच क्लीन आणि जर्कसाठी वेगवेगळी पदके दिली जातात. मात्र, ऑलिम्पिकमध्ये एकूण वजन उचलण्यासाठी  पदक देण्यात येते.