पुणे : दोनवेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरलो म्हणजे माझी कारकीर्द संपत नाही. माझ्यापुढे अजून बरीच मोठी कारकीर्द शिल्लक असल्याचे रविवारी वाघोली येथे दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविणारा मल्ल हर्षवर्धन सदगीर याने सांगितले.

‘‘किताबी लढतीनंतर चाहत्यांच्या गराड्यात अडकल्यानंतर तालमीत पोहचण्यास उशीर झाल्यानंतरही सहकाऱ्यांनी केलेले स्वागत यामुळे आपण भारावून गेलो. किताबी लढतीत सराव सहकारी महेंद्र गायकवाड याच्यावर मात केल्याचे दुःख असले, तरी शेवटी खेळात कोण तरी एकच जण जिंकतो. या वेळी मी जिंकलो. भविष्यात महेंद्रदेखील हा किताब जिंकू शकतो,’’ असेही हर्षवर्धन म्हणाला. ‘‘महेंद्र चांगला मल्ल आहे. आम्ही दोघेही आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात काका पवार यांच्याकडे मार्गदर्शन घेतो. त्यामुळे कुणीही जिंकले तरी आमच्या तालमीचे नाव मोठे होणार होते याचा अधिक आनंद आहे,’’ असे हर्षवर्धनने सांगितले.

किताबी लढतीनंतर अनेक माध्यमातून हर्षवर्धन याने कुस्तीचा विजयी निरोप घेतल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. ‘‘दुसरे विजेतेपद आणि त्यामुळे झालेल्या आनंदाच्या भरात मी बोलून गेलो. माझा निवृत्तीचा विचार अजिबात नाही. माझ्याकडे अनुभव दांडगा असून, त्याचा उपयोग करून मला अजून खूप खेळायचे आहे,’’ असे हर्षवर्धनने स्पष्ट केले. पहिल्या विजेतेपदानंतर मला शासनाकडून सेवेत सामवून घेतले जाईल अशी अपेक्षा होती. अनेक प्रयत्न केले. पण, ते फोल ठरले. मात्र, आता सरकारची भूमिका बदलली आहे. यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत दाखल करून घेतले जाते. भविष्यात सरकारने शासकीय सेवेत रुजू होण्याचा प्रस्ताव ठेवल्यास नक्कीच स्वीकारेन, असे सांगून हर्षवर्धनला आता शासकीय नोकरीची गरज नसल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

आपल्या शैलीविषयी बोलताना संयम राखून प्रतिस्पर्ध्याच्या नियोजनानुसार खेळणे आपल्याला अधिक आवडते, असे सांगून हर्षवर्धनने दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब हा सर्वात मोठा क्षण असल्याचे सांगितले. ‘‘राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळविल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे आपले स्वप्न आहे. करोनाच्या काळात संधी मिळाली होती. मात्र, तेव्हा स्पर्धाच रद्द झाल्यामुळे माझे स्वप्न अर्धवट राहिले. आता भविष्यात अधिक मेहनत करून हे स्वप्नही साकार करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे,’’ असे हर्षवर्धन म्हणाला.

तालमीत सहकाऱ्यांचा जल्लोष सुरू असतानाच उपस्थित असलेले गुरू काका पवार यांनी किताबी लढतीमधील दोन्ही मल्ल माझेच होते. याचा आनंद मला अधिक आहे. त्यामुळे एक जिंकला, दुसरा हरला याचे वाईट वाटण्यापेक्षा आपले मल्ल प्रगती करत आहेत याचा अभिमान वाटतो, असे सांगितले. ‘‘हर्षवर्धन भावनेच्या भरात जेतेपद मिळविल्यानंतर काही बोलून गेला. पण, तसे काही नाही. त्याला अजून खूप काही करायचे आहे. थोड्या विश्रांतीनंतर भविष्यातील नियोजन करायला सुरूवात करू. सध्या राज्यातील मल्लांना शासनाकडून अधिक भरीव मदत अपेक्षित आहे,’’ असे काका पवार यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा पाचवा ‘महाराष्ट्र केसरी’

मल्ल म्हणून काका पवार दिवंगत हरिश्चंद्र बिराजदार यांच्या गोकुळ वस्ताद तालमीत आणि कडक शिस्तीत तयार झाले. तेव्हा ‘महाराष्ट्र केसरी’ कुठला तर गोकुळ वस्ताद तालमीचा असे समीकरण जुळून आले होते. अनेक किताब विजेते मल्लांची परंपरा या तालमीने मिरवली. ही परंपरा बिराजदारांच्या पाश्चात त्यांचा पठ्ठा काका पवार यांनी सुरू ठेवली आहे. आतापर्यंत काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाने पाच वेळा या किताबाचा मान मिळविला आहे.