Maharashtra Kesari 2026 Harshvardhan Sadgir vs Mahendra Gaikwad: पुण्यातील वाघोळी येथे ६८व्या महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना खेळवला गेला. स्पर्धेचा अंतिम सामना हर्षवर्धन सदगीर आणि बाहुबली ओळख मिळवलेल्या महेंद्र गायकवाड यांच्यात खेळवण्यात आला. हर्षवर्धन सदगीरने महेंद्र गायकवाडवर ३ गुणांनी विजय मिळवला. या विजयासह नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा विजेता ठरला. यासह डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमानही त्याने मिळवला आहे.

चुरशीच्या अंतिम लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडचा ४-३ अशा फरकाने पराभव केला. पुण्यातील या प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. सोलापूरचा महेंद्र गायकवाड म्हणजे आक्रमक अंदाजात खेळ करणं आणि हर्षवर्धनने मात्र या लढतीत आक्रमक आणि संयम खेळ यांचा अचूक मेळ साधला. यासह तो महेंद्र गायकवाडला टक्कर देत मानाची चांदीची गदा पटकावण्यात यशस्वी ठरला. हर्षवर्धन हा महाराष्ट्राचा सातवा डबल केसरी ठरला.

सहा मिनिटांच्या दोन फेऱ्या खेळवल्या गेल्या. त्यामधील पहिल्या फेरीत दोघांनी एक एक गुण घेतला होता. पहिल्या फेरीतच गुणांची बरोबरी झाली होती. दुसऱ्या फेरीत दोघेही आक्रमक झाले होते. दोन्ही पैलवानांना इशारा दिला गेला. यानंतर शेवटच्या दीड मिनिटांमध्ये तीन गुण मिळवत सदगीरने आघाडी मिळवली. गायकवाडनेही अखेरील तीन गुण मिळवले पण वेळ संपल्याने हर्षवर्धनने निसटता विजय मिळवला.

महाराष्ट्र केसरी २०२६ विजेत्या हर्षवर्धन सदगीरला विजयानंतर बक्षिस म्हणून काय मिळालं?

रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजेत्या हर्षवर्धन सदगीरला मानाची चांदीची गदा, ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि फॉर्च्युनर गाडी देण्यात आली आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला स्कॉर्पिओ आणि चार लाखांचे रोख पारितोषिक देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र केसरीमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने जय पाटीलचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तर माती विभागात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख या दोन तगड्या पैलवानांमध्ये लढत झाली आणि महेंद्रने सिकंदरला धोबीपछाड देत अंतिम फेरी गाठली होती. अखेरीस महेंद्र गायकवाडलाही निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हर्षवर्धन सदगीरने याआधी २०२०चा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यावेळी त्याने वेताळ शेळकेचा पराभव करत पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यानंतर हर्षवर्धनने आता सहा वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारत मानाच्या गादीवर नाव कोरलं.

यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच ५ माजी महाराष्ट्र केसरी सहभागी झाले होते. मात्र, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि गतविजेता पृथ्वीराज मोहोळ यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर सिकंदर शेख अंतिम फेरी गाठू शकला नाही. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने विजेतेपद पटकावत डबल केसरी होण्याचा मान पटकावला.