भारत दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज हशिम अमला धावांसाठी झगडत आहे; परंतु दक्षिण आफ्रिकेचे संघ व्यवस्थापन मात्र अमलाच्या फॉर्मबाबत आशावादी आहे. मुंबईत सूर गवसल्यास अमला शतक झळकावेल, असा विश्वास आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी व्यक्त केला आहे. मात्र क्रिकेट हा असा खेळ आहे की, जिथे प्रत्येक फलंदाजासाठी पुढील डाव हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो, अशा शब्दांत अमलाने क्रिकेटचे तत्त्वज्ञान मांडले. तसेच रविवारच्या सामन्यात विजयी खेळी ‘अमला’त आणणार असल्याचे त्याने सांगितले.
वानखेडे स्टेडियमवरील पाचव्या आणि निर्णायक लढतीला आत्मविश्वासाने सामोरे जाताना अमला म्हणाला, ‘‘प्रत्येक डावाला प्रारंभ करण्यापूर्वी मोठी खेळी साकारण्याचे ध्येय सर्वच फलंदाज जपतात. मग आधीच्या डावात शतक झाले असले तरी, ही इच्छा मात्र सदैव जागृत असते, परंतु काही वेळा निराशा पदरी पडते.’’
भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील दोन सामन्यांत अमलाने ३८ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय मालिकेतील ४ सामन्यांत फक्त ६६ धावा झाल्या आहेत. त्यामुळे अमलाच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र स्वत:च्या फलंदाजीबाबतच्या प्रश्नालाही अतिशय संयमाने तोंड देताना अमला म्हणाला, ‘‘स्वाभाविकपणे मलाही अधिकाधिक धावा काढाव्याशा वाटतात, परंतु प्रत्येक वेळी माझ्या खात्यावर मोठी धावसंख्या असू शकत नाही. अन्य फलंदाजांचेसुद्धा संघाच्या कामगिरीत योगदान मिळत असते, परंतु मुंबईतील सामन्यात माझ्याकडून धावा झाल्यास मला धन्यता वाटेल. संघाच्या विजयासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा प्रयत्न असतो.’’
अमलाच्या फलंदाजीची आम्ही कधीच चिंता करीत नाही, असे डोमिंगो यांनी या सामन्याआधी मत प्रकट केले होते. अमला आणि आणि ए बी डी’व्हिलियर्स हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०हून अधिक धावांची सरासरी जपणारे खेळाडू आहेत. अमला दर्जेदार खेळाडू असून तो लवकरच हा कारकीर्दीचा खराब टप्पा ओलांडेल, असे डोमिंगो यांनी सांगितले होते. त्यामुळे निर्णायक लढतीतील अमलाच्या कामगिरीकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष असेल.

वानखेडेवरील आकडेवारीबाबत अमला अनभिज्ञ
वानखेडे स्टेडियमवरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आतापर्यंतच्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. मात्र अमलाने या आकडेवारीबाबत अनभिज्ञता प्रकट केली. तो म्हणाला, ‘‘वानखेडेवरील या आकडेवारीबाबत मला काहीच माहीत नाही. प्रामाणिकपणे सांगायचे, तर यामुळे काहीच फरक पडणार नाही. अतिशय अटीतटीच्या एकदिवसीय मालिकेतील महत्त्वाचा सामना मुंबईत होत आहे, याच दृष्टिकोनातून मी सामन्याकडे पाहात आहे.’’
amlalalalalal