भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. यादरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यातील घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँ आणि मुलीला दरमहा ४ लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबत आता पत्नी हसीन जहाँ हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने हसीन जहाँ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आदेश दिले आहेत. १ जुलै रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की, याचिकाकर्त्या क्रमांक एक (पत्नी हसीन जहाँ) यांना दरमहा १,५०,०००/- रुपये आणि तिच्या मुलीला दरमहा २,५०,०००/- रुपये देणे हे दोन्ही याचिकाकर्त्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करेल.

कोर्टाच्या आदेशानंतर हसीन जहाँ हिचं वक्तव्य समोर आलं आहे. तिने यामध्ये शमीने तिला नोकरी सोडण्यास भाग पाडल्याचं सांगितलं आहे. हसीन जहाँ म्हणाली, “मी लग्नाआधी मॉडेल होते आणि अभिनय देखील करायची. पण शमीने मला नोकरी सोडायला भाग पाडलं. मी पूर्णपणे गृहिणी असावं, अशी त्याची इच्छा होती. माझं शमीवर इतकं प्रेम होतं की आनंदाने ते सहज मान्य केलं. त्यामुळे आता माझ्याकडे काहीच पैसे नाहीत. आता आमची सर्व जबाबदारी शमीलाच घ्यावी लागणार आहे. त्याने यासाठी नकार दिल्यानंतर मला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता.”

“आपल्या देशात असा एक कायदा आहे, जो लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे आदेश देतो, यासाठी देवाचेच आभार. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर आपलं नात नव्याने सुरूवात करत असाल तर त्याच्या चेहऱ्यावर असं लिहिलेलं नसतं की ती व्यक्ती वाईट आहे, गुन्हेगार आहे किंवा मग तो तुमच्या आणि तुमच्या मुलीचे भविष्य धोक्यात आणेल. मी पण यालाच बळी पडली.”, असं हसीन जहाँ एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

“देवाने मोठमोठ्या गुन्हेगारांना माफ केलं आहे. तो त्याच्या मुलीची सुरक्षितता, भविष्य आणि आनंद पाहू शकत नाहीय. त्याने हसीन जहाँचं आयुष्य खराब करण्याचा हट्टीपणा सोडला पाहिजे. तो माझं काहीच वाईट करू शकत नाही कारण मी न्यायाच्या मार्गावर जातेय आणि तो अन्यायच्या मार्गावर आहे.”, असं शेवटी हसीन जहाँ म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हसीन जहाँ ही एक मॉडेल आणि चीअरलीडर होती, जिने २०१४ मध्ये शमीशी लग्न केलं. २०१८ मध्ये तिने शमीवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ केल्याचे आरोप केले होते.