IPL 2026 Captaincy: आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या आठवड्यात रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. भारतीय टी-२० संघाचा भाग नसलेल्या खेळाडूंनी आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दिग्गज खेळाडूंनी पहिल्याच सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. या हंगामातील सर्व १० संघांचे कर्णधार भारतीय आहेत. २०१९ मध्ये झालेल्या हंगामानंतर दुसऱ्यांदाच असा योगायोग पाहायला मिळाला आहे. यासह आणखी एक विलक्षण विरोधाभास पाहयला मिळाला आहे. १० कर्णधारांपैकी ७ कर्णधार हे भारतीय टी-२० संघातून बाहेर आहेत. तर सूर्यकुमार यादवने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. पण तो एक कर्णधार नसून फलंदाजाच्या भूमिकेत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. पण त्यानंतर तो २०२५ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून आला होता. मुख्य बाब म्हणजे, वर्ल्डकपविजेता कर्णधार इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसून आला होता. यावेळी असंच काहीसं सूर्यकुमार यादवच्या बाबतीत घडलं आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने २०२६ टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली आहे. पण तो हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळत असून, पहिल्याच सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसून आला होता.

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. पण तो एकदाही जेतेपदाची ट्रॉफी उंचावू शकला नव्हता. २०२५ मध्ये झालेल्या हंगामात ही जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली, त्याने पहिल्याच हंगामात संघाला चॅम्पियन बनवलं. पण मुख्य बाब म्हणजे, तो भारतीय टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी दूरदूर पर्यंत दावेदार नाही. तर श्रेयस अय्यर पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असून, तो भारतीय टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे आणि गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करत असलेल्या शुबमन गिल यांचीही हीच अवस्था आहे. मुख्य बाब म्हणजे, रियान पराग आणि ऋतुराज गायकवाड यांना टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण हे खेळाडू देखील टी-२० संघाच्या बाहेर आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंत देखील टी-२० संघाचा भाग नाही.

सर्वात आश्चर्यचकीत करणारी बाब अशी की, सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप जिंकला आहे. जगातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असूनही तो आयपीएल स्पर्धेत एकाही संघाचा कर्णधार नाही. तो मुंबई इंडियन्ससाठी केवळ एक खेळाडू म्हणून मैदानात उतरतो.