…तर बाबर आझम विराट कोहलीलाही मागे टाकू शकतो !

माजी पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केलं मत

करोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीतही माजी पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तर आणि रमीझ राजा यांनी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याचा मुद्दा चर्चेला काढून नवीन वाद निर्माण केला. त्यातच रमीझ राजा यांनी पाकिस्तानच्या बाबर आझमचं कौतुक करताना, त्याने आपल्या खेळात सुधारणा केली तर तो विराट कोहलीवरही मात करु शकतो असं वक्तव्य केलं आहे.

“बाबर आझममध्ये विराट कोहलीवर मात करण्याची क्षमता आहे. पण यासाठी त्याला स्वतःमध्ये बदल करावा लागेल. आपल्या खेळात बदल केला आणि अधिक सकारात्मक वृत्तीने मैदानात उतरल्यास तो अव्वल दर्जाचा खेळाडू बनू शकतो. बाबरचा खेळ सुधारेल असं वातावरण त्याला मिळायला हवं, त्याच्याशिवाय तो स्वतःमधल्या प्रतिभेला न्याय देऊ शकणार नाही.” रमीझ राजा स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान, “क्रिकेटबद्दल भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतका तणाव का असतो माहिती नाही. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकमेकांना चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळले जायला हवेत. किमान त्या दृष्टीने आता प्रयत्न तरी करायला हवेत. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सर्वाधिक प्रेक्षकवर्गाची उपस्थिती होती. थेट प्रक्षेपणात देखील हा सामना सर्वाधिक पाहिला गेला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या साऱ्यांनाच भारत-पाकिस्तान सामने व्हायला हवेत. चाहत्यांनीच आता भारत-पाक सामने तटस्थ ठिकाणी खेळवायचा आग्रह धरायला हवा”, असे मत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: He has the potential to beat even virat kohli ramiz raja on young pakistan batsman psd