Vaibhav Sooryavanshi Reaction On Sachin Tendulkar Post: भारताचा युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करु शकतो, हे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने जगाला दाखवून दिलं आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूपासून वैभवने तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याच्याकडे सर्वात जलद शतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. वैभवने आपल्या फटकेबाजीने क्रिकेटच्या देवालाही भुरळ घातली आहे. या खेळीनंतर सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टवर वैभव सूर्यवंशीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिनने आपल्या एक्स अकाऊंटवर वैभवचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती. सचिनने लिहिले, “वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग कमालीचा आहे. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे, लेग साइडला येणाऱ्या चेंडूंवर तो ज्या सुंदर पद्धतीने फ्रंट फुट बाजूला काढून स्वतःसाठी जागा तयार करतो, ते पाहण्यासारखं आहे. त्यामुळे त्याला स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळण्याचं स्वातंत्र्य मिळतं. त्याची ही खेळी खरोखरच थक्क करणारी होती!”

सचिनने कौतुक केल्यानंतर आता वैभव सूर्यवंशीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिनने आपली खेळी पाहून कौतुक केलं आहे, याबाबत वैभवला काहीच कल्पना नव्हती. हा सामना झाल्यानंतर आयपीएलच्या संकेतस्थळासाठी ध्रुव जुरेलसोबत चर्चा करत असताना, कोणीतरी त्याला सचिनच्या पोस्टबद्दल सांगितले. तेव्हा कुठे वैभव सूर्यवंशीला याची कल्पना आली.

सचिन तेंडुलकरने आपलं कौतुक केलं आहे, हे ऐकून वैभव सूर्यवंशीला सुखद धक्का बसला. ज्यांना आपण क्रिकेटचा देव मानतो, त्यांच्याकडून अशी दाद मिळणे हा अत्यंत अभिमानाचा आणि मनाला प्रचंड प्रेरणा देणारा क्षण आहे, असं वैभव म्हणाला. वैभव म्हणाला, “सर, हे ऐकून खरोखर खूप चांगलं वाटलं. यामुळे मला आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हीच मला याबद्दल सांगितलं, मला तर माहितच नव्हतं. अर्थातच, ते क्रिकेटचे देव आहेत, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. जर त्यांनी अशी काहीतरी पोस्ट शेअर केली असेल, तर आमच्यासारख्या नवोदीत खेळाडूंसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासारख्या दिग्गजांनी माझी दखल घेतली, हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे.”