भारतीय संघ महिनाभरापूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात झालेली बाचाबाची चर्चेच्या केंद्रस्थानी ठरली. तो प्रसंग अनुभवलेल्या विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेलने तेव्हा नेमकं काय घडलं ते सांगितलं. आकाश चोप्रा यांच्या पॉडकास्टमध्ये ध्रुव सहभागी झाला होता. त्यावेळी चोप्रा यांनी त्याला यासंदर्भात प्रश्न विचारला.
श्रीलंका दौऱ्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी हा प्रसंग घडला. यशस्वीने चांगली सुरुवात केली होती. तो ४५ धावांवर खेळत होता. असिथाच्या गोलंदाजीवर त्याने तीन चौकार लगावले होते. १७व्या षटकात असिथाने त्याला बाद केलं. बाद केल्यानंतर यशस्वी ड्रेसिंगरुमच्या दिशेने जाऊ लागला. त्याचवेळी असिथाने जोरदार आनंद व्यक्त करत विकेट साजरी केली. परतताना यशस्वी मागे फिरला आणि तो असिथाच्या दिशेने गेला. दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि यशस्वीने हेल्मेटने असिथाच्या डोक्याला टक्कर मारली. श्रीलंकेचे अन्य खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप केला. हे सगळं चित्रित झालं. खेळांच्या नियमांनुसार प्रतिस्पर्धी खेळाडूशी शारीरिक संपर्क किंवा मारहाण याला स्थान नाही. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध फुटबॉलपटू झिनेदिन झिदानने हेडबट केलं होतं. त्याच्यावर कारवाई झाली होती.
दिवसाचा खेळ संपल्यानंतर सामनाधिकाऱ्यांसमोर प्रकरणाची सुनावणी झाली. यशस्वी जैस्वालवर काही सामन्यांच्या बंदीची कारवाई होईल अशी चिन्हं होती मात्र तसं झालं नाही. यशस्वी आणि असिथा दोघांच्याही मानधनातून २५ टक्के मानधन रक्कम कापून घेण्यात आली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने यशस्वीला मैदानाबाहेर जाण्याची सूचना केली होती.
दरम्यान यशस्वी इतका का भडकला? यावर ध्रुव म्हणाला, ‘यशस्वी बाद झाला तेव्हा तो शांतपणे परतत होता. तो काहीही बोलला नाही. तु्म्ही फुटेज पाहिलं तर बाद झाल्यानंतर लगेचच तो वळला आणि ड्रेसिंगरुमकडे जाऊ लागला. पण असिथा सतत त्याला उद्देशून शेरेबाजी करत होता. यशस्वी मला म्हणाला विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाने आनंद साजरा करणे स्वाभाविक आहे. मला त्याचं काहीच वाटलं नाही. गोलंदाज आक्रमक पद्धतीने विकेटचा आनंद साजरा करतात. पण तो मला शिव्या देत होता. हे योग्य नाही’.
यशस्वी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघातही ध्रुवचा सहकारी आहे. यशस्वीला कुणी बोललं तर तो त्याला सुनावतो का? यावर ध्रुव म्हणाला, ‘१०० टक्के. तो स्वत:हून शेरेबाजी सुरू करणार नाही. तो फलंदाजी करताना त्याच्या झोनमध्ये असतो. फलंदाजीबाबत तो बोलत असतो. पण गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकांनी उकसवलं तर तो गप्प बसणार नाही’.
