Duleep Trophy, Tilak varma Out On 99 Runs: दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ईस्ट झोन संघ मजबूत स्थितीत आहे. कर्णधार इशान किशनच्या २७० धावांच्या विक्रमी खेळीच्या बळावर ईस्ट झोन संघाने ७०८ धावांचा डोंगर उभारला. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्त पडिक्कलसह कर्णधार तिलक वर्माने किल्ला लढवला. तिलक वर्माकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण त्याचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं.
या सामन्यात ईस्ट झोनचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. ईस्ट झोनच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि ७०८ धावांचा डोंगर उभारला . या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना साऊथ झोन संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण तसं झालं नाही. चांगली सुरूवात मिळूनही फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. देवदत्त पडिक्कलने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्माने शेवटपर्यंत किल्ला लढवला.
साऊथ झोन संघाने ३०० धावांचा पल्ला गाठला होता. त्यावेळी संघातील ९ फलंदाज माघारी परतले होते. तिलक वर्मा आणि एमडी निधीश ही शेवटची जोडी मैदानावर होती. ९९ धावांवर फलंदाजी करत असलेल्या श्रेयसला शतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. ईस्ट झोनकडून डावातील १०८ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद कोनेन कुरेशी गोलंदाजीला आला. या षटकातील सुरूवातीचे चेंडू त्याने निर्धाव खेळून काढले. पुढच्या षटकात स्ट्राईकवर येण्यासाठी त्याला मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. त्यावेळी त्याने समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातात गेला. त्यामुळे त्याला ९९ धावांवर माघारी परतावं लागलं. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार मारले. जर त्याने सहज चेंडू ढकलून एक धाव पूर्ण केली तर शतक पूर्ण झालं असतं आणि पुढच्या षटकात तो स्ट्राईकवरही येऊ शकला असता.
ईस्ट झोनची विजयाच्या दिशेने वाटचाल
ईस्ट झोनचा संघ सुरूवातीपासूनच मजबूत स्थितीत आहे. ईस्ट झोनच्या फलंदाजांनी सुरूवातीचे दोन्ही दिवस फलंदाजी केली आणि ७०८ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. ईस्ट झोनकडून इशान किशनने सर्वाधिक २७० धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या साऊथ झोन संघाला हवी तशी सुरूवात मिळू शकली नाही. सलामीवीर नारायण जगदीशन ३२, तर देवदत्त पडिक्कल ६२ धावा करून माघारी परतला. तर तिलक वर्माने ९९ धावा केल्या. साऊथ झोनचा पहिला डाव ३३६ धावांवर आटोपला. यासह ईस्ट झोनेन पहिल्या डावात ३७० धावांची आघाडी घेतली आहे.
