Mumbai T20 league Final Controversy: टी-२० मुंबई लीग स्पर्धेतील अंतिम सामना आर्क्स अंधेरी आणि मराठा रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अंतिम सामना जसा हवा, तसाच हा सामना रंगला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांना विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. अखेर मराठा रॉयल्सकडून रोहन राजेने निर्णायक षटक टाकलं आणि मराठा रॉयल्स संघाला सलग दुसऱ्यांचा जेतेपदाची ट्रॉफी जिंकून दिली. पण या सामन्यादरम्यान अनेक नाट्यमय घटना घडल्या. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, धावांचा पाठलाग करत असताना मराठा रॉयल्स संघाकडून १९ वे षटक टाकण्यासाठी इरफान उमेर गोलंदाजीला आला. त्यावेळी गौरव जठर स्ट्राईकवर होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर गौरव जठरने खणखणीत षटकार खेचला. त्यामुळे मराठा रॉयल्स संघावरील दबाव वाढला. पण पुढच्याच चेंडूवर सामना मराठा रॉयल्स संघाच्या बाजूने फिरला. कारण इरफान उमेरने त्याला पायचीत करत माघारी धाडलं. त्यामुळे गौरव जठरचा डाव १७ चेंडूत २३ धावांवर आटोपला.

गौरव जठर बाद झाल्यानंतर मराठा रॉयल्स संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. त्यावेळी गौरव जठर आणि मराठा रॉयल्स संघाचा अनुभवी गोलंदाज तुषार देशपांडे यांच्यात बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले. त्यावेळी मोईन खान आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिळवला. पण त्यामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला.

हा वाद इतक्यात थांबला नाही, त्यानंतर मराठा रॉयल्स संघातील अनुभवी खेळाडू रोहन राजे आर्क्स अंधेरीच्या डगआऊटच्या दिशेने धावत गेला. पण त्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये धराधरी झाली. त्यावेळी खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना मध्यस्थी करावी लागली. शेवटचे षटक टाकण्यासाठी रोहन राजे गोलंदाजीला आला. या षटकात आर्क्स अंधेरी संघाला विजयासाठी १४ धावांची गरज होती. पण रोहन राजेने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि मराठा रॉयल्स संघाला सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून दिला.