Heinrich Klaasen Viral Video: सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. फलंदाजी करताना असा एकही कोपरा नसतो, जिथे हेनरिक क्लासेनने मारलेला चेंडू जात नाही. मैदानावर जरी आक्रमक असला, तरीदेखील तो आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शांत स्वभावाचा हेनरिक क्लासेन हाणामारीची भाषा करताना दिसून आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तो फोटोची मागणी करणाऱ्या चाहत्यावर संताप व्यक्त करताना दिसून येत आहे.
हेनरिक क्लासेन आयपीएल २०२६ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. या हंगामात तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. आतापर्यंत तो कुठल्याही खेळाडूसोबत किंवा अंपायरसोबत वाद घालताना दिसून आलेला नाही. पण मैदानाबाहेर त्याचा पारा चढला. क्रिकेट चाहत्याने असं काही केलं, जे हेनरिक क्लासेनला मुळीच आवडलेलं नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
खेळाडूंना सतत प्रवास करावा लागतो. एक सामना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना दुसऱ्या शहरात जाण्यासाठी विमानाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे विमानतळावर क्रिकेट चाहते फोटोची मागणी करतात, यासह ऑटोग्राफची मागणी करतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात हेनरिक क्लासेनचा आवाज ऐकू येत आहे. हा व्हिडीओ विमानतळावरील किंवा हॉटेलमधील असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये हेनरिक क्लासेन रागात बोलताना दिसून येत आहे. एका क्रिकेट चाहत्याने परवानगीशिवाय हेनरिक क्लासेनचा आणि त्याच्या कुटुंबाचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. हे हेनरिक क्लासेनला मुळीच आवडलं नाही. त्यामुळे तो क्रिकेट चाहत्यावर भडकला.
क्रिकेट चाहता व्हिडीओ शूट करत होता, हेनरिक क्लासेनने त्याला शूट करु नकोस असं सांगितलं. पण त्याने काही ऐकलं नाही. त्यामुळे त्याने त्या चाहत्याला धमकी दिली. तो म्हणाला, “इथून निघून जा… जर मी मागे फिरलो आणि तू मला इथे दिसला तर मी तुला आपटून मारेल. त्यामुळे मागे फिर आणि निघून जा.” सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. अनेक युझर्सने हेनरिक क्लासेनने जे काही केलं, त्याचं समर्थन केलं आहे. कारण खेळाडूंना प्रायव्हसी मिळायला हवी. हे खेळाडू फोटो काढण्यास नकार देत नाहीत. पण कुटुंबासोबत असताना ते फोटो काढणं टाळतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी त्यांना त्रास दिला नाही पाहिजे, असं अनेकांचं म्हणणं आहे.
