Heinrich Klassen Revealed Reason Behind Retirement: दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्लासेनने अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. यापूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्लासेन त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर संघासाठी सामना एकहाती फिरवू शकतो. पण त्याने ३३ व्या वर्षी अचानक निवृत्तीची घोषणा केली. पण आता क्लासेनने निवृत्ती घेण्यामागचं कारण स्पष्ट करत मोठं वक्तव्य केलं आहे.
३३ वर्षीय क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी, ६० एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये ३ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. क्लासेनने अखेर निवृत्तीच्या निर्णयावर आपले मौन सोडले आणि म्हटले की, दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकू दे किंवा पराभूत होऊदे याबाबत त्याला काही वाटत नव्हते आणि हे बऱ्याच काळापासून त्याला जाणवत असल्याने त्याने निवृत्तीची घोषणा केली.
क्लासेन इतकही म्हणाला की, तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळू इच्छित होता, परंतु मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी व्हाईट-बॉल प्रशिक्षकपदावरून राजीनामा दिल्यामुळे आणि त्याला केंद्रीय करारातून वगळल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणण्यास भाग पाडले गेले.
क्लासेनने निवृत्तीबाबत बोलताना सांगितलं, “मला बऱ्याच दिवसांपासून असं वाटत होतं की मला माझ्या कामगिरीची किंवा संघ जिंकेल की नाही याची पर्वा वाटत नव्हती. त्यामुळे मी चुकीच्या ठिकाणी असल्याचं वाटत होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, मी रॉबशी (रॉब वॉल्टर कोच) बराच वेळ चर्चा केली आणि मी त्याला सांगितलं की जे काही घडत आहे त्याबद्दल मला काही ठिक वाटत नाहीये.”
“आम्ही (क्लासेन आणि कोच रॉब यांनी) एकमेकांशी छान चर्चा केली. आम्ही २०२७ च्या विश्वचषकापर्यंत सगळं व्यवस्थित प्लॅन केलं. त्यामुळे जेव्हा त्यांनी कोच म्हणून राजीनामा दिला आणि सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत क्रिकेट दक्षिण आफ्रिकाशी योजनेनुसार चर्चा झाली नाही. तेव्हा मला निर्णय घेणं अजून सोपं झालं,” असं क्लासेन पुढे म्हणाला.
क्लासेन पुढे म्हणाला, “आता मी सहा-सात घरच्यांबरोबर राहू शकतो. माझ्या कुटुंबालाही मी सोबत असण्याची गरज आहे. गेली ४ वर्षे मी खूप प्रवास केलाय. आता मला थोड्या विश्रांतीची गरज आहे.”
क्लासेनची फिरकी गोलंदाजांविरूद्ध वादळी फटकेबाजीमुळे तो दक्षिण आफ्रिकेसाठी सर्व फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा खेळाडू होता. क्लासेन आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३, आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ आणि आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सदस्य होता.