Heinrich Klassen Hyderbadi Biryani Video: सनरायझर्स हैदराबाद संघाचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन यंदा उत्कृष्ट फॉर्मात आहे. क्लासेनने संघाच्या तिन्ही सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण खेळी केल्या. लखनौविरूद्धच्या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरला. मैदानावर जबरदस्त कामगिरी करणारा हेनरिक क्लासेनला मैदानाबाहेर मात्र घाम फुटला आहे. हैदराबादी बिर्यानी खाताना क्लासेनच्या डोळ्यातून पाणी आलं. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी फक्त १ सामना जिंकला आहे, तर दोन सामने गमावल्याने संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. यादरम्यान नितीश रेड्डीने इन्स्टाग्रामवर क्लासेनचा एक व्हीडिओ शेअर केला होता.
सनरायझर्स हैदराबादच्या गोटात सध्या खेळाडू मैदानाबाहेरही मजा-मस्ती करताना दिसत आहेत. अशातच हेनरिक क्लासेनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो बिर्याणी खाताना रडताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला हैदराबादी बिर्याणीची चव चाखणं चांगलंच महागात पडल्याचं दिसत आहे. नितीश कुमार रेड्डीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कर्णधार इशान किशनही उपस्थित आहे. नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला असून “हैदराबादी चव सगळ्यांनाच पचत नाही,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हैदराबादी बिर्याणी म्हणजे तिखट आणि मसाल्यांची मेजवानी! पण हीच मेजवानी दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनला चांगलीच जड गेली आहे. बिर्याणीचे केवळ काही घास खाताच क्लासेनला घाम फुटला आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. बिर्याणी इतकी तिखट होती की, क्लासेनला आपला घाम आणि डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी रूमालाचा आधार घ्यावा लागला.
क्लासेन तिखट बिर्याणी खाऊन सैरभैर झालेला असताना, त्याच्या शेजारी बसलेला सनरायझर्सचा कर्णधार इशान किशन मात्र या क्षणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसला. क्लासेनची अवस्था पाहून इशानला हसू आवरलं नाही. इतर खेळाडूही क्लासेनच्या या प्रतिक्रियेवर हसताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ “क्लासेनसाठी बिर्याणी खूपच तिखट ठरली!” अशा कॅप्शनसह हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
हैदराबादी बिर्याणी खाताना जिथे क्लासेनच्या डोळ्यात पाणी येत आहे. मात्र सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुनने मात्र हे त्याचं फेव्हरेट फूड असल्याचं सांगत फोटो पोस्ट केला आहे. त्याने अलीकडेच हैदराबादी बिर्याणीचा फोटो शेअर करत, ज्यात त्याने हैदराबादी बिर्याणील जगातील बेस्ट फुड म्हटलं होतं. पण हेनरिक क्लासेनसाठी मात्र हे बेस्ट फुड चांगलंच महागात पडलं.
