भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (१ ऑगस्ट) सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा खास पाहुणचार झाला. सेंट किट्समधील भारताचे हाय कमिशनर डॉ. केजे श्रीनिवास यांनी भारतीय संघाला निमंत्रण दिले होते. प्रशिक्षक राहुल द्रविडसह संघातील सर्व खेळाडूंनी त्यांची भेट घेतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या भेटीची काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

वेस्ट इंडीज आणि भारताचे परराष्ट्रीय संबंध प्रदीर्घ काळापासून चांगल्या स्थितीमध्ये आहेत. वेस्ट इंडीजमध्ये भारतीय वंशाचे अनेक लोक वास्तव्याला आहेत. शिवाय दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापार, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संबंध चांगले आहेत. हे संबंध भविष्यातही चांगले रहावेत यासाठी तिथे हाय कमिशनरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या डॉ. केजे श्रीनिवास पदभार सांभाळत आहेत. त्यांनी संपूर्ण भारतीय संघाला खास निमंत्रण दिले होते.

बीसीसीआयने या भेटीचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सर्व खेळाडूंनी भेटीचा आनंद लुटल्याचे दिसत आहे. या भेटीदरम्यान डॉ. केजे श्रीनिवास यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला मानचिन्ह भेट दिले.

हेही वाचा – IND vs WI 2nd T20I Playing XI: भारताची विजयी घोडदौड रोखण्यासाठी वेस्ट इंडीज असेल प्रयत्नशील; जाणून घ्या संभाव्य संघ

विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शानदार खेळ दाखवला होता. रोहित शर्माने ४४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. तर, दिनेश कार्तिकने १९ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४१ धावा फटकावल्या होत्या.