नवी दिल्ली : भारतीय टेबल टेनिस महासंघाला न्यायालयात खेचणाऱ्या मनिका बत्राला लक्ष्य केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी प्रकट केली. क्रीडापटूंना लक्ष्य केले जाऊ नये आणि लक्ष्य केले गेले असेल, तर ती गंभीर समस्या आहे, असे ताशेरे न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी ओढले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात अनिवार्य हजेरीच्या नियमाबाबत आव्हान देणारी याचिका मनिकाने उच्च न्यायालयात दाखल केली होती, ‘‘भारतीय संघटनेप्रमाणेच आता आंतरराष्ट्रीय संघटनेकडूनही एखाद्या आरोपीप्रमाणे वागूणक दिली जात आहे, भारतीय संघटनेने त्यांना माझ्या कृतीबाबत कळवले असावे. आता मला स्पर्धेच्या सरावाकडे लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे,’’ असे मनिकाने म्हटले आहे.

सांगवान यांना क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

’  नवी दिल्ली : अधिक यशस्वी व्यक्ती स्पर्धेत असल्याने हॉकी प्रशिक्षक संदीप सांगवान यांचा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी विचार झाला नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांमध्ये नाव नसल्याने सांगवान यांनी युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी नोटीस बजावत केंद्राला या याचिकेचे उत्तर देण्याचे आदेश दिले. केंद्राच्या वतीने अ‍ॅड. अनिल सोनी यांनी सांगवान यांच्यापेक्षा अधिक यशस्वी आणि गुणवान व्यक्तींचे अर्ज असल्याने त्यांना पुरस्कार दिला नसल्याने स्पष्ट केले. सांगवान गेली १५ वर्षे हॉकी प्रशिक्षक  आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.