दुसरी टेस्ट अनिर्णित राखत वेस्ट इंडिजने तब्बल २३ वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. २००३ मध्ये वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती. त्यानंतर श्रीलंकेने मालिका जिंकली. दोन मालिका अनिर्णित राहिल्या. २०१५ मध्ये श्रीलंकेने पुन्हा बाजी मारली. २०१८ मधली मालिका अनिर्णित झाली. २०११ मध्येही मालिकेचा निर्णय अनिर्णित असाच राहिला. त्याच वर्षी श्रीलंकेने सरशी साधली. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयाचा आनंद साजरा केला.
श्रीलंकेने पहिल्या डावात ५४९ धावांचा डोंगर उभारला. पाथुम निसांकाच्या ऐवजी लहिरू उडाराने २१ चौकार आणि ५ षटकारांसह १८८ धावांची मॅरेथॉन खेळी केली. सोनल दिनूशा (९२), कामिंदू मेडिस (८४), कुशल मेंडिस (६९) या तिघांनी अर्धशतकी खेळी केल्या. दुखापतींमुळे श्रीलंकेचे ४ प्रमुख खेळाडू या कसोटीत खेळू शकले नाहीत. मात्र नव्या खेळाडूंनी गड सांभाळला.
वेस्ट इंडिजने ४९९ धावांची मजल मारत श्रीलंकेला चांगली टक्कर दिली. श्रीलंकेला ५० धावांची अल्प आघाडी मिळाली. जस्टीन ग्रीव्ह्जने १८० धावांची शानदार खेळी केली. शे होपने ११२ धावा केल्या. या दोघांनी ५ पाचव्या विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी केली. सलामीवीर जॉन कॅम्पबेलने ७२ धावा केल्या. श्रीलंकेने असिथा फर्नांडोने ५ तर प्रभात जयसूर्याने ३ विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात श्रीलंकेने २५१ धावांवर डाव घोषित केला. दिनेश चंडिमलने ७१ धावांची अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडिजतर्फे अल्झारी जोसेफने २ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेने वेस्ट इंडिजला ३०२ धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र हे लक्ष्य पार करण्यासाठी वेस्ट इंडिजकडे जेमतेम दीड सत्रच होतं. वेस्ट इंडिजचे सलामीवीर जॉन कॅम्पबेल आणि ब्रँडन किंग यांनी बिनबाद १०९ धावांची भागीदारी केली. लक्ष्य गाठणं शक्य होणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर दोन्ही संघांनी अर्निणितवर समाधान मानलं. जस्टीन ग्रीव्हजला सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
१४०८ धावा, २८ विकेट्स आणि पावसामुळे बाधित काही सत्रं असा हा सामना झाला. वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ‘आमच्यासाठी हा विजय मोलाचा आहे. संघातील प्रत्येकाने योगदान दिलं त्यामुळे हा विजय प्रत्यक्षात साकारला. हा सामना अनिर्णित झाला असला तरी एकाक्षणी आम्ही बरेच पिछाडीवर होतो. आम्ही पुनरागमन करत श्रीलंकेला टक्कर दिली. प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकू शकलो याचा आनंद आहे. या मालिकेदरम्यान केमार रोचने ३०० विकेट्सचा टप्पा ओलांडला. केमार अनुभवी गोलंदाज आहे. एवढी वर्ष सातत्याने खेळत राहणं आणि विकेट्स पटकावणं सोपं नाही. वेगवान गोलंदाजांना दुखापतींची शक्यता असते. ते लक्षात घेता केमारचं यश देदिप्यमान आहे. जस्टीन ग्रीव्हजने तो या प्रकारातही खेळू शकतो हे सिद्ध केलं’, असं वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेसने सांगितलं.
