भारतीय संघ दोन टेस्टच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दुखापतींनी ग्रासल्यामुळे भारतीय संघात अनेक बदल झाले आहेत. गेल्या काही वर्षात श्रीलंकेचा संघ तुलनेने कमकुवत झाला आहे मात्र घरच्या मैदानावर त्यांच्याविरुद्ध खेळणं आव्हानात्मक असणार आहे. पाचूचं बेट असं वर्णन होणाऱ्या श्रीलंकेत खेळणं सोपं नाही. भारतीय संघाने श्रीलंकेत २३ टेस्ट खेळल्या असून, यापैकी ९ मध्ये विजय मिळवला आहे. ७ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे तर ७ टेस्ट अनिर्णित झाल्या आहेत. श्रीलंका दौऱ्यात भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचवेळी श्रीलंकेने भारताविरुद्ध अनोखा विक्रम नावावर केला आहे.

टेस्ट क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या


टेस्ट क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या भारताविरुद्ध श्रीलंकेनेच नोंदवली आहे. १९९७ साली भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. कोलंबो इथल्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या लढतीत धावांची टांकसाळ पाहायला मिळाली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना नवज्योतसिंग सिद्धू, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या शतकांच्या बळावर ५३७ धावसंख्येवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेने ९५२ धावांचा डोंगरच उभारला. कातळासमान खेळपट्टीवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीना निष्प्रभ ठरवलं. सनथ जयसूर्याने ३६ चौकार आणि २ षटकारांसह ३४० धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. रोशन महानामाने २२५ तर अरविंदा डीसिल्व्हाने १२६ धावांची खेळी केली. हा सामना फक्त दोन डाव होऊनच अनिर्णित झाला. जयसूर्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

पहिल्याच चेंडूवर विकेट


याच सामन्यात भारतातर्फे फिरकीपटू नीलेश कुलकर्णीने पदार्पण केलं. नीलेशने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर मर्वन अट्टापटूला बाद केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम नीलेशने केला. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम फक्त २५ गोलंदाजांच्या नावावर आहे. या यादीत नीलेश हा एकमेव भारतीय आहे.मुंबई क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर नीलेशला भारतीय संघात संधी मिळाली. पहिल्याच चेंडूवर विकेट घेत नीलेशने संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. मात्र यानंतर केवळ दोन सामन्यात नीलेशला भारतासाठी खेळायची संधी मिळाली.

हार्दिक पंड्याचं टेस्टमधलं एकमेव शतक श्रीलंकेत


अष्टपैलू हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. मात्र दुखापतींच्या ससेमिऱ्यात असल्यामुळे हार्दिकला टेस्ट आणि वनडेत फारच कमी खेळता येतं. २०१७ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना पल्लेकल टेस्टमध्ये हार्दिकने शतक झळकावलं होतं. ८ चौकार आणि ७ षटकारांसह हार्दिकने ९६ चेंडूत १०८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. हार्दिकच्या टेस्ट कारकिर्दीतलं हे एकमेव शतक ठरलं. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि १७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. हार्दिकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

११ खेळाडूंनी केलं श्रीलंकेत पदार्पण


सुरेश रैना, लालचंद राजपूत, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, सदानंद विश्वनाथ, देबाशीष मोहंती, नीलेश कुलकर्णी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या यांनी श्रीलंकेत भारतासाठी पदार्पण केलं. महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल, वृद्धिमान साहा हे सगळे असताना विकेटकीपर नमन ओझाला भारतीय संघात स्थान मिळवणं अवघड होतं. मात्र धोनीला विश्रांती आणि एकाचवेळी बाकी खेळाडूंना झालेल्या दुखापती यामुळे नमन ओझाचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. २०१५ श्रीलंका दौऱ्यात कोलंबोतल्या सिंहली स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या टेस्टमध्ये ओझाने पदार्पण केलं. ओझाने २१ आणि ३५ धावांची खेळी केली तसंच ५ खेळाडूंना बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र ओझाला पुन्हा भारतीय संघात कधीच संधी मिळाली नाही.

श्रीलंकेत विदेशी फलंदाजांतर्फे सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर


सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत खेळलेल्या १२ टेस्टमध्ये ११५५ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये एक द्विशतकही आहे. श्रीलंकेत विदेशी खेळाडूंतर्फे सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्याच नावावर आहे. पाकिस्तानचा युनिस खान दुसऱ्या तर बांगलादेशचा मुशफकीर रहीम तिसऱ्या स्थानी आहे.