दुबई : पाकिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पराभवानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला समाजमाध्यमांवरून ‘लक्ष्य’ करणाऱ्या धर्मांधांना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खडसावले आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे अतिशय निंदनीय असल्याचे मत कोहलीने व्यक्त केले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सलामीच्या लढतीत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने १० गडी राखून पराभूत केले. या सामन्यात शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या. त्यामुळे काहींनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून त्याने जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचे आरोप केले. मात्र, या टीकाकारांना कोहलीने प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मामुळे लक्ष्य करणे ही अतिशय निंदनीय बाब आहे. आम्ही मैदानात जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो यामागे काही कारणे आहेत. काही ‘कणा नसलेल्या’ व्यक्ती इथपर्यंत पोहोचण्याचा विचारही करू शकत नाहीत. त्यांना समाजमाध्यमांवरून इतरांना लक्ष्य करता येते, पण प्रत्यक्षात त्यांना आमच्यासमोर बोलताही येत नाही,’’ असे कोहली म्हणाला.

‘‘प्रत्येकाला स्वत:ची मते मांडण्याचा अधिकार असला तरी धर्मामुळे एखाद्याला लक्ष्य करणे चुकीचे आहे. शमीने मागील काही वर्षांत भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. लोकांना याकडे दुर्लक्ष करायचे असल्यास मला अशा लोकांसाठी माझा वेळ वाया घालवायचा नाही,’’ असेही कोहलीने स्पष्ट केले.