Delhi Premier League 2026: क्रिकेटच्या मैदानावर काहीही अनोखं घडू शकतं याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा एकदा आला. दिल्ली प्रीमिअर लीगच्या लढतीत एक अशक्य रनआऊट पाहायला मिळाला. या रनआऊटमुळे खुद्द खेळाडू, अंपायर, कॉमेंटेटर्स आणि चाहते सगळे अवाक झाले.

शुक्रवारी न्यू दिल्ली टायगर्स आणि आऊटर दिल्ली वॉरियर्स यांच्यात सामना झाला. आऊटर संघाला शेवटच्या चेंडूवर एका चेंडूत एका धावेची आवश्यकता होती. त्यांच्याकडे दोन विकेट्स होत्या. एक धाव सहज होईल अशी परिस्थिती होती. आऊटरतर्फे प्रथम सलूजाने टायगर्स संघाच्या लक्ष्मणचा चेंडू मिडऑफच्या दिशेने तटवला. चेंडू हिंमत सिंगच्या दिशेने गेला. चेंडू हातात घेऊन स्टंप्सवर मारण्यासाठी तो सरसावला. पण चेंडू पकडताना तो गोंधळला आणि रनआऊट हुकला. याच रागात त्याने चेंडू लाथाडला. आश्चर्यचकित म्हणजे त्याने लाथाडलेला चेंडू स्टंप्सवर जाऊन आदळला.

जेव्हा चेंडू स्टंप्सवर आदळला तेव्हा अहुजा क्रीझबाहेर असल्याचं स्पष्ट झालं. या सगळ्या प्रकाराने अहुजा, खुद्द हिंमत सिंग, त्याचे सहकारी, अंपायर, कॉमेंटेटर्स अचंबित झाले. कॉमेंटेटर्स रनआऊट चुकला म्हणून आऊटर संघ जिंकला याचं वर्णन कॉमेंटेटर्स करणार तोच रनआऊट झाल्यामुळे सामना टाय झाला. यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यामध्ये आऊटर दिल्ली वॉरियर्सने विजय मिळवला. दिल्ली प्रीमिअर लीगच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर होताच व्हायरल झाला. वन्स इन अ मिलिअन रनआऊट अशा कॅप्शनसह त्यांनी व्हीडिओ शेअर केला. रनआऊटची संधी गमावली आणि सामनाही याचं दु:ख असतानाच काही सेकंदात लाथाडलेल्या चेंडूने रनआऊट होऊन सामना टाय होणं हे अकल्पित आहे अशा आशयाच्या प्रतिक्रया चाहत्यांनी दिल्या आहेत.

२९वर्षीय हिंमत सिंग आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळला आहे.