नागपूर : ‘कोलकाता नाइट रायडर्स’ (केकेआर) या ‘इंडियन प्रीमिअर लिग’ (आयपीएल) स्पर्धेत बांगलादेशी क्रिकेटपटूला करारबद्ध केल्याबद्दल आध्यात्मिक नेते जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला लक्ष्य केले. ‘त्याचा (शाहरुख) दृष्टिकोन नेहमीच देशद्रोह्यासारखा राहिला आहे’, अशी टीका त्यांनी नागपूर येथे ‘पीटीआय’शी बोलताना केली. तत्पूर्वी आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर यांनीही याबद्दल शाहरुखवर टीका केली.
‘आयपीएल’च्या २०२६च्या हंगामासाठी बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला ‘केकेआर’ने करारबद्ध केले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना, तेथील खेळाडूच्या ‘आयपीएल’ संघातील समावेशाला जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी आक्षेप घेतला. तसेच केंद्र सरकारने अशा घटना सहन न करता या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घ्यावी, असे म्हटले. शिवाय बांगलादेशची निर्मिती हिंदूंच्या मदतीने झाली आहे, हे तेथील नागरिक आणि सरकारला समजावून सांगितले पाहिजे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी बांगलादेशी खेळाडूंना ‘आयपीएल’ लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिल्याबद्दल ‘बीसीसीआय’ आणि ‘आयसीसी’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांनी उत्तर दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
