Sunil Gavaskar On David Miller: दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात डेव्हिड मिलर तुफान चर्चेत राहिला. २११ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीकडून केएल राहुलने ९२ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने आधी दुखापतीमुळे मैदान सोडलं, त्यानंतर संघाला गरज असताना तो पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी आला. दिल्लीला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. पण शेवटच्या २ चेंडूवर चूक केल्याने दिल्लीच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली. पण सुनील गावसकर त्याला समर्थन करताना दिसून आले आहेत.
सुनील गावसकर म्हणाले, “डेव्हिड मिलर खूप चांगला खेळतोय. त्याला स्वतःवर विश्वास होता की, तो सामना संपवू शकतो. त्याचा हेतू चांगला होता. प्रसिध कृष्णाने खूप चांगला स्लोव्हर चेंडू टाकला, जो डेव्हिड मिलर खेळू शकला नाही. दबाव असताना असं होतं.”
यासह इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनने देखील डेव्हिड मिलरने हा निर्णय का घेतला असावा, याबाबत वक्तव्य केलं आहे. पीटरसन म्हणाला, “डेव्हिड मिलरच्या डोक्यात सामना ड्रॉ करण्याऐवजी, सामना जिंकावा हेच सुरू असावं. त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास होता की, तो सामना संपवू शकतो. कुलदीप यादववर विश्वास ठेवण्याऐवजी त्याने स्वतः सामना जिंकून देण्याचा विचार केला.”
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने २० षटकांअखेर २१० धावा केल्या. गुजरातकडून फलंदाजी करताना साई सुदर्शनने १२ धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिलने ७० धावांची दमदार खेळी केली. जोस बटलरने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. ग्लेन फिलिप्स १४ धावांवर नाबाद राहिला. २११ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून पथूम निसांकाने ४१ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर केएल राहुलने ९२ धावांची खेळी केली. शेवटी डेव्हिड मिलरने नाबाद ४१ धावा केल्या. दिल्लीचा संघ विजयापासून १ धाव दूर राहिला.
