Jammu-Kashmir vs Karnataka: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना जम्मू – काश्मीर आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये पार पडला. कर्नाटक संघाकडे या स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्याचा आणि जिंकण्याचा दांडगा अनुभव होता. तर दुसरीकडे जम्मू – काश्मीर संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अनुभव कमी होता पण खेळात ते कुठेच कमी पडले नाही.
पहिल्या डावात फलंदाजी करताना जम्मू – काश्मीर संघाने ५८४ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्नाटक संघाचा डाव अवघ्या २९३ धावांवर आटोपला. यासह जम्मू – काश्मीर संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन दुसऱ्या डावात ४ गडी बाद ३४२ धावा केल्या. दुसऱ्या डावात जम्मू-काश्मीर संघाची आघाडी ही ६०० धावांच्या पार गेली होती. पण जम्मू- काश्मीर संघा ने डाव घोषित केला नव्हता. शेवटी पाचव्या दिवसातील तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मिळून खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. यासह जम्मू-काश्मीर संघाने उल्लेखनीय कामगिरी करून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं.
या सामन्यात जम्मू – काश्मीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जम्मू – काश्मीर संघातील फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीला आलेला कामरान इकबाल स्वस्तात माघारी परतला. पण यावेर खानने ८८ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. तर शुभम पुंडिरने १२१ धावांची खेळी केली. अब्दुल समदने ६१ धावा केल्या. तर कन्हैय्या वाधवनने ७० तर साहिल लोत्राने ७२ धावा केल्या. यासह जम्मू – काश्मीर संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५८४ धावांचा डोंगर उभारला.
जम्मू – काश्मीर संघाने इतक्या मोठ्या धावांचा डोंगर उभारल्यानंतर कर्नाटक संघालाही चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण तसं होऊ शकलं नाही. कर्नाटक संघाकडून एकट्या मयांक अगरवालने एकाकी झुंज देत १६० धावांची खेळी केली. त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. अनुभवी केएल राहुल अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. तर देवदत्त पडिक्कलनेही अवघ्या ११ धावा केल्या. इतर कुठलाही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. कर्नाटकचा पहिला डाव २९३ धावांवर आटोपला. यादरम्यान जम्मू काश्मीर संघाकडून गोलंदाजी करताना आकिब नबीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर सुनील कुमार आणि युद्वीर सिंग यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर शुभम लोत्राने १ गडी बाद केला.
जम्मू – काश्मीरने घेतली मोठी आघाडी
जम्मू – काश्मीर संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली होती. याचा फायदा घेत त्यांनी दुसऱ्या डावात आणखी धावांची भर घातली. पहिल्या डावात फ्लॉप ठरलेल्या कामरान इकबालने दुसऱ्या डावात नाबाद १६० धावांची खेळी केली. तर साहिल लोत्राने नाबाद १०१ धावा केल्या. जम्मू-काश्मीरने या डावातही ३४२ धावा केल्या. कर्नाटक संघाला दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची संधी न देता जम्मू- काश्मीर संघाने हा सामना खिशात घातला.
